डॉ. कांचनगंगा गंधे (पुणे)
अशोक कुमार सिंग (लखनौ)
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला २१ पत्रींसह श्री गणेशाची षोड्शोपचार पूजा विविध प्रकारच्या पूजा सामग्रीनेही करतात. त्यातल्या काही सामग्रीची थोडक्यात माहिती या लेखमालेतून देणार आहोत. धार्मिक अनुष्ठान, पूजा, भक्ती, मंगलकार्याची सुरवात श्रीगणेशाच्या पूजेने करतात. गणेशाचं प्रतिकात्मक रूप म्हणजे ‘सुपारी’- ‘पूगीफल’! ‘पूग’ म्हणजे ‘ऐक्य’. ‘ऐक्य’ भावनेने कार्य पूर्तीस नेणारे ते ‘पूगीफल’, यावरूनच सुपारीचे महत्त्व अधोरेखित होते.
तिच्या माध्यमातून ‘विघ्नहर्ता’ गणेशाप्रती असलेली निष्ठा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे संस्कार भारतीय संस्कृतीत आहेत. हिंदू धर्मात सुपारीला दिव्य आणि शुभघटक मानतात. मंगलप्रसंगी ओवळताना, लग्नकार्यात मुहूर्त मंडपाला, वराच्या वस्त्राला पूगीफळ बांधण्याचा प्रघात आहे. वाजंत्रीवाले, पुरोहित, गोंधळी यांना आमंत्रण करताना ‘सुपारी’ देतात आणि तेही आमंत्रण स्वीकारल्याची सुपारी देतात. धार्मिक कार्यात कलशात सुपारी ठेवतात. ‘पूगीफल’ हीच ‘गणेश प्रतिमा शमजून नागवेलीच्या पानावर ‘सुपारी’ ठेवून प्रथम तिची पूजा करत.