कोल्हापूर : आमचं गाव आणि घर दोन-अडीचशे किलोमीटरवर. सणाला सुटी मिळणार नाही. इथं आमचं घर नाही. असंच कुठंतरी गोदामात झोपतो. गोदाम हेच आमचं तात्पुरतं घर. अशा स्थितीत आम्ही गणेशोत्सव साजरा कसा करणार, असा कोणताही निराशाजनक सूर न आळवता रेल्वे मालधक्क्यावरील दोनशेवर माथाडी, कष्टकरी कामगार एकत्र आले. कामाचे ठिकाण हेच आपले घर... काम सुरू ठेवणे हीच आपली भक्ती... असाच भाव मनी घेऊन गणेशोत्सवाची थाटात नाही; पण मनःपूर्वक पूजा-अर्चा केली. गणपती बाप्पाला आलिशान घर लागत नाही. कामाचा अडथळा होत नाही. मनापासून केलेल्या उत्सवातही गणपती बाप्पा रोजगाराचा प्रसाद आम्हाला जरूर देतो... हाच भाव कष्टकऱ्यांनी आज अधोरेखित केला.
रेल्वे मालधक्क्यावर वॅगनमधील साखर, सिमेंट, धान्याची पोती उचलण्याचे काम करण्यासाठी बार्शी, अक्कलकोट, तुळजापूर, विजापूर, उदगीर, गोकाकसह सीमाभागातील सुमारे २०० वर माथाडी कामगार असून, ते बारमाही काम करतात. बहुतेक संसारिक आहेत. उत्सव थाटात साजरा करण्याची इच्छा बहुतेकांना असते; मात्र माल वाहतूक सुरू असल्याने त्यांना गावी जाता येत नाही, रोजगार बुडतो. कामाचा खोळंबा होतो म्हणून उत्सवाला सगळे येथेच थांबतात. कामाचे ठिकाण हेच घर मानून २५ वर्षांपूर्वी मुकादम आण्णा शिंदे, गोरख लेंडवे, रुद्राप्पा तेली, कृष्णात चौगुले आदींनी पुढाकार घेत धक्क्यावर गणेशोत्सवास सुरुवात केली. ही परंपरा आजही कायम ठेवली.
सकाळी बहुतेक माथाडी झोपेतून उठले आणि हौदावर अंघोळ आवरली. इतक्यात वॅगन येताच सगळे पटापट पोती उचलू लागले. मोजके पंधरा-वीस जण टेम्पो घेऊन गणपती आणायला गेले. तोपर्यंत दहा-बारा जणांनी धक्क्यावरील मुकादम खोली साफ केली. टेबलावर रंगीत कापड घातलं. रंगीत बल्ब लावले. अर्ध्या तासात नेटकी सजावट केली. तासाभरात बापट कॅम्पमधून दोन फुटी मूर्ती घेऊन टेम्पो आला. दोन माथाडींच्या बलदंड बाहूत पाटावर विराजमान बाप्पाला टेम्पोतून शंभर पावलं चालत प्रतिष्ठापनेला आणलं. तोपर्यंत कामावरील माथाडीही हातपाय धुवून आले. दहा मिनिटांत तयारी झाली. सगळ्यांनी आरतीचा सूर धरला.. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने एका बाप्पाने दोनशे कौटुंबीक नात्यांना एकत्र केल्याची जणू साक्ष दिली.
आम्ही सगळे घरापासून लांब आहोत; पण काम सांभाळून घटकाभरात सण साजरा करतो. या निमित्ताने सगळे एकत्र येतो. जयघोष करतो. आमची शक्ती एकवटते. परगावात आम्हाला काही संकट आलेच तर आम्ही सगळे एकमेकांच्या मदतीने ते संकट दूर करत नातं जपतो. सण साजरा करताना नाते जपण्याची ऊर्जा लाभते. या बळावर बारमाही रोजगाराचा प्रसाद आम्हाला लाभतो.
- कृष्णात चौगुले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.