पापाची तिकटी येथे ये-जा करण्यासाठी एकेरी मार्गाचे नियोजन नसल्यामुळे तेथेही वारंवार चेंगराचेंगरी झाली.
कोल्हापूर : पापाची तिकटी, महालक्ष्मी चौक, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी येथील नियोजनाच्या अभावामुळे चेंगराचेंगरी आणि लाठीहल्ला झाला. खुद्द पोलिस अधीक्षकांना महाद्वार रोडवरील (Mahadwar Road) मंडळांना (Ganpati Visarjan Miravnuk Kolhapur) पुढे जाण्याची विनंती करावी लागली.
बिनखांबी ते पापाची तिकटी येथे मिरवणूक रेंगाळली, त्याचा फटका नागरिकांना चेंगराचेंगरीतून बसला. या मुख्य मार्गावर मिरवणूक पुढे नेण्यासाठी सक्षम पोलिस अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी चेंगराचेंगरी वाढली. मिरवणूक लवकर संपविण्यासाठी अखेर मिरजकर तिकटीला पोलिसांनी लाठीहल्ला केला. मात्र, क्रमवारी पूर्वीच ठरल्यामुळे मंडळांतील कार्यकर्त्यांचे वाद टळले.
महाद्वार चौक आणि गर्दी हे समीकरण असतानाही तेथे पोलिसांची सक्षम फळी नव्हती. बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी येथे मंडळांना पुढे सरकविणे, ताराबाई रोडवरील मंडळांना नियंत्रित ठेवणे हे महत्त्वाचे काम करणारी यंत्रणा तेथे दिसलीच नाही. सक्षम अधिकाऱ्यांसह त्यांचे पथक या मार्गावर आहे की नाही अशी स्थिती होती. प्रॅक्टिस क्लब सुमारे पाऊणतास एकाच ठिकाणी थांबून होते. त्यामुळे खुद्द पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हस्तक्षेप करून मिरवणूक पुढे नेली.
त्याचा परिणाम नागरिकांना, महिलांना चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागले. मिरजकर तिकटी येथे उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी ट्रॅक्टरची किल्ली काढून घेण्यापर्यंत धाडस दाखविले; पण काही अधिकाऱ्यांनी आपल्या बैठकीची जागा सोडली नसल्याचे बिनखांबी ते पापाची तिकटीवर चेंगराचेंगरी आणि किरकोळ वाद झाले.
महाद्वार रोडवर धोकादायक इमारती असतानाही त्या उतरविल्या नाहीत. परिणामी पत्रे लावून त्यांना संरक्षण द्यावे लागले हे सुद्धा चेंगराचेंगरीचे एक कारण ठरले. क्रमावारीसाठी असलेल्या लकी ड्रॉ मुळे मुख्य मार्गावर येण्यासाठीचे वाद टळले. तरीही मिरवणूक रेंगाळत राहिली. परिणामी, मुख्य मार्गावर सायंकाळी पाच ते रात्री बारापर्यंत केवळ १२ ते १५ मंडळांनाच आनंद घेता आला.
पापाची तिकटी येथे ये-जा करण्यासाठी एकेरी मार्गाचे नियोजन नसल्यामुळे तेथेही वारंवार चेंगराचेंगरी झाली. मंडळाचे कार्यकर्ते उत्साहाने पुढे जात असल्याने चेंगराचेंगरी होत होती. तेथे पोलिसांची फळी उभी ठेवता आली नाही. येथे जखमी झालेल्या एका लहान मुलाला रुग्णवाहिकेतून पळवावे लागले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह इतरांनी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांची भेट घेऊन वेगवेगळे मार्ग करण्याची विनंती केली. त्यानंतर काही प्रमाणात बदल झाला.
रात्री बारानंतर आवाज बंद झाला, महाद्वार रिकामा झाला. तरीही मिरजकर तिकटी येथील मंडळांनी ‘जैसे थे’ थांबण्याची भूमिका घेतली. आम्हाला रोटेशनने पुढे सोडले नाही, असा आरोप त्यांनी पोलिसांवर केला. अखेर मध्यरात्री दोनच्या सुमारास पोलिसांनी दमदाटी करून मंडळांना पुढे जाण्यास सांगितले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी केलेल्या उर्मट वर्तनामुळे पोलिसांनी थेट लाठीहल्ला केला. दोघांना रस्त्याकडेला ओढत नेले, खाली पाडून लाठीहल्ला केला. महाराणा प्रताप चौकातील मंडळ असल्यामुळे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी दबंग स्टाईलने येऊन वाद मिटविण्याचा आणि मूर्ती पुढे नेण्याची भूमिका घेतली. यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली आणि साधारण साडेचारच्या सुमारास मिरजकर तिकटी रिकामी झाली.
अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनी कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला भेट दिली. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. ते कोल्हापुरात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. कोल्हापूर परिक्षेत्राची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांनी येथे भेट दिल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिरवणुकीच्या मुख्यमार्गावर पापाची तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर असे चालत येण्यास मनाई होती. मात्र तरीही लोक उलट्या दिशेने येत होते. दोन्ही बाजूंनी नागरिक चालत होते. त्यातच मंडळांचे कार्यकर्ते त्यांना बाजूला ढकलत होते. महाद्वार चौकात सायंकाळी साडेतासच्या सुमारास ताराबाई रोडवरून वाघाची तालीम मंडळाचा प्रवेश झाला. त्यामुळे या चौकात गर्दी वाढली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यामध्ये काही जण जखमी झाले. अशाच घटना महाद्वार रोडवर दोन वेळा अनुभवास आल्या.
अवचितपीर तालमीने चांद्रयान मोहिमेवर आधारित देखावा बनवला होता. यामध्ये हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांद्रयान बनवले होते. यावेळी भारताची अवकाश संशोधकांची परंपरा दर्शवणारी छायाचित्रेही होती. मात्र, हा देखावा महाद्वारवर येऊ शकलाच नाही.
दिलबहार तालीम मंडळाला संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीत प्रवेश मिळाला. ७ वाजता त्यांचा गणपती महाद्वार चौकात होता. यावेळी पोलिसांनी त्यांना गणपती पुढे नेण्याची विनंती केली. त्यावेळी माजी नगरसेवक सचिन पाटील, विनायक फाळके आणि पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तुम्ही आम्हालाच का टार्गेट करता, असे त्यांनी पोलिसांना विचारले. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.