‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात झालेल्या बाप्पाच्या आगमापाठोपाठ आता ‘आली आली गौराई, सोन्यारूनप्याच्या पावलानं, आली आली गौराई, धनधान्याच्या पावलानं’ असे म्हणत मंगळवारी (ता. १०) सोनपावलांनी माहेरवाशीण ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे.
गौराईंसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी औरंगपुरा, केळी बाजार, गुलमंडी परिसरात रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे चित्र होते. गौराईंच्या आकर्षक मुखवट्यांची महिलांना भुरळ पडत आहे.
विविध दागिने, रेडिमेड साड्या खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. गौराईंचे मुखवटे कापडी, शाडू, फायबर आणि पीओपीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. प्रामुख्याने यंदा या सणाचे आकर्षण म्हणजे फेटे असणाऱ्या गौरी उपलब्ध आहेत. त्यामुळे गौराईंचे मुखवटे अगदी सुंदर, आकर्षक दिसत आहेत.
त्यामुळे हे मुखवटे महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये विविध रंगांचा वापर करून गौराईचे आकर्षक मुखवटे बाजारात तयार करण्यात आले आहेत. यामध्ये अगदी १००० रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत आकर्षक मुखवटे आणि सेट उपलब्ध आहेत.