यावर्षी सर्वसाधारणपणे १८० भजन मंडळांची नोंद झाली असून, दिवसाला किमान १८ ते २० भजने होतात.
कुडाळ : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे (Ratnagiri-Sindhudurg Loksabha Constituency) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या निवासस्थानी असणाऱ्या श्री गणेशासमोर या मतदार संघातील १८० हून अधिक मंडळांची भजने दरवर्षी साजरी केली जातात. या सर्व भजनी मंडळांची मनोभावे सेवा करण्याचे काम राऊत कुटुंबीय करतात.
दररोज तब्बल १८ ते २० मंडळांची भजने (Bhajans) होतात. दोन वर्षांपूर्वी तर विक्रमी २१० हून अधिक भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. निसर्गाने नटलेला सिंधुदुर्ग जिल्हा आपल्या विविध कलांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोकणची दशावतार लोककला ही सातासमुद्रापार पोहोचली आहे. त्याचबरोबर श्रींचे नामस्मरण करण्याचे माध्यम म्हणजे भजन होय.
कोकणातील गणेशोत्सव काळातील गावोगाव आपली कला भक्तिरसाच्या माध्यमातून सादर करणारी भजनी मंडळे हे येथील आणखी एक वैशिष्ट्य. या कलेतून श्रींची मनोभावे सेवा केली जाते. खऱ्या अर्थाने श्रावण महिन्यापासून सणासुदीला सुरुवात होते. या महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रम म्हटले की सोबत भजन हे आलेच. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भजन मंडळे कार्यरत आहेत.
अनेकजण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ही आपली भजन कला पुढे नेत आहेत. या कलेला गेल्या काही वर्षांपासून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी मोठमोठ्या भजन स्पर्धा घेतल्या जातात. ही कला स्पर्धा इतर विविध उपक्रमांतून टिकून राहावी यासाठी अनेक संस्था, मंडळे पुढाकार घेऊन याची जोपासना करत आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सवात श्रींच्या समोर भजन करून त्याची मनोभावे सेवा करण्याची भजनी मंडळाची कित्येक वर्षाची परंपरा आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा मतदार संघाचे खासदार राऊत यांनी गेली काही वर्षे सातत्याने आपल्या मतदार संघातील विविध भजन मंडळांना निमंत्रित करून भजनरूपी सेवेचा वसा चालविला आहे. राऊत यांच्या घरचा गणपती अकरा दिवसांचा असतो. त्यांनी आपल्या मतदार संघातील आतापर्यंत ११ दिवसांच्या गणेश चतुर्थी कालावधीत त्यांच्याकडे रेकॉर्ड ब्रेक २१० हून अधिक भजनी मंडळांनी श्रींच्या समोर भजन सेवा सादर केली आहे.
यावर्षी सर्वसाधारणपणे १८० भजन मंडळांची नोंद झाली असून, दिवसाला किमान १८ ते २० भजने होतात. दुपारी एक वाजता सुरू होणारी भजने पहाटेपर्यंत सुरू असतात. अशावेळी अचानक नोंद नसणारी भजन मंडळेसुद्धा आली तरी त्यांना या ठिकाणी श्रींची भजनरूपी सेवा करण्याची संधी दिली जाते. विशेष म्हणजे खासदार राऊत हे भजनीप्रेमी असल्याने ते सुद्धा या भजनविश्वात जागरण करून रममाण होतात. सर्व भजन मंडळांचा यथोचित सन्मान केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.