Ganesh Chaturthi 2023: गणपतीच्या प्रसादात काय द्याल आणि काय नाही?

महाराष्ट्रामध्ये गौरी-गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthisakal
Updated on

आहारतज्ञ दिनराज मोहिनी आपोणकर

आपल्या लाडक्या 'बाप्पा'चे आगमन झाले आहे. त्यामूळे घरोघरी लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मखर सजतोय, साफसफाई होतेय, पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही विसरताय, तो म्हणजे बाप्पाचा प्रसाद!! दरवर्षीप्रमाणे बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना पेढे, चिप्स, समोसा वगैरे देऊन तुम्ही त्यांच स्वागत करणार असेल तर थांबा!! कारण या दहा दिवसात चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढ, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, डिप्रेशन, फॅटी लिव्हर, इत्यादी आजारांना तोंड द्यावे लागू शकते.

म्हणूनचं या गणपतीला प्रसादात काय खायचं नाही हे आधी बघूया.

चिप्स/ बटाट्याचे वेफर-

बटाट्याचे वेफर, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा विक पॉइंट! आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात, बटाट्याच्या वेफरने प्रसादाच्या प्लेटमध्ये जागा मिळवली आहे. पाहायला गेलं तर बटाट्यामध्ये पोषक असे कार्बोहायड्रेटस आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात. परंतु त्याच बटाट्याच्या वेफर्समध्ये सोडियम आणि फॅटस् अधिक प्रमाणात आढळतात, ज्याच्या अती सेवनामुळे उच्च रक्तदाब, तसेच हृदयविकाराचा धोका संभावतो.

नुट्रीयंट्स या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार बटाट्याचे वेफर तळताना त्यात ऍक्रीलामाईड नावाचा घटक तयार होतो, ज्यामुळे आरोग्याच्या दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे यावर्षी गणपतीच्या प्रसादातून बटाट्याचे वेफर्स वगळल्यास ती एक आरोग्यदायी सुरुवात होऊ शकते.

चॉकलेट मोदक - 

"उकडीचे मोदक बनवायचे म्हणजे, एक वेगळीच कटकट असते डोक्याला. त्यापेक्षा चॉकलेटचे मोदक बरे" असं म्हणत गेल्या काही वर्षात गणपतीच्या दिवसात घरोघरी चॉकलेट मोदक दिसायला लागले. अर्थात त्यामुळे स्वयंपाक घरातली मेहनत वाचली तरी, उकडीच्या मोदकातून मिळणारे फायदे कमी झाले.

कारण चॉकलेटच्या मोदकात अतिरिक्त प्रमाणात साखर घातलेली असते. याशिवाय त्यातून शरीराला आवश्यक असणारे उपयुक्त पोषकघटक, जसे की फायबर, प्रोटीन इत्यादी मिळत नाहीत. त्यामुळे फक्त अधिक कॅलरीज शरीरात जाऊन, पर्यायाने आरोग्याची हानीचं होते.

Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi 2023: गणोशोत्सवात गोडधोड खाऊनही स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

पेढे - 

प्रसादात गोड द्यायचं म्हटलं, तर पेढे हा पारंपारिक पर्याय ओघानेच येतो. परंतु आजकाल पेढे बनवण्यासाठी रासायनिक रंग, फॉरमॅलीन आणि नित्कृष्ट दर्जाचा खवा वापरला जातो. ज्याचा थेट परिणाम किडनी किंवा यकृतावर होऊ शकतो. बऱ्याचदा पेढे शुद्ध तुपाऐवजी, डालड्यामध्ये बनवले जातात. ज्यामुळे शरीरामध्ये ट्रान्स फॅट नावाचा हृदयाला हानिकारक असलेला घटक अति प्रमाणात पोहोचतो. म्हणूनचं प्रसादात बाहेरून आणलेल्या पेढ्याऐवजी घरी बनवलेले पेढे उत्तम!!

चांदीचा वर्ख लावलेल्या मिठाया -

लहान मुलांना चांदीचा वर्ख लावलेल्या मिठाया नेहमीच आकर्षित करतात. पण हा वर्ख खाण्यायोग्य नसेल तर? अन्न आणि औषध विभाग, पुणे यांनी केलेल्या एका संशोधनानुसार, मिठायांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चांदीच्या वर्खामध्ये ॲल्युमिनियमची भेसळ केली जाते. हा ॲल्युमिनियम शरीरामध्ये साठून राहून, त्यामुळे डिमेन्शिया आणि अल्झायमर यासारखे दीर्घकालीन आजार उद्भवू शकतात.

बटाटावडा/ समोसा -

फास्ट फूडच्या जमान्यात, प्रसादाच्या प्लेटमध्ये समोसा आणि बटाट्यावड्याची जागा नसेल तर नवलच! बऱ्याचदा दुकानदार एकाच तेलात बराच वेळ पदार्थ तळत राहतात. ज्यामुळे तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रान्स फॅट आणि कॅन्सरसारख्या रोगांना वाव देणारे घटक तयार होतात. ज्याचा थेट परिणाम पचनसंस्थेवर आणि हृदयावर होऊ शकतो.

आता तुम्हाला प्रश्न पडेल की, हे सर्व खायचं नसेल तर नक्की खायचं काय? सांगतो, आरोग्यदायी आणि सोपे पर्याय सांगतो. बाप्पाच्या प्रसादातून अधिकाधिक पोषक घटक मिळवण्यासाठी खालील पदार्थ उपयुक्त ठरू शकतात.

मोदक - 

" मोदक" म्हणजे आनंद देणारा.. पण हा मोदक आनंदासोबत आरोग्यही देतो. मोदकाचे सारण हे नारळ आणि तूप यांच्या मिश्रणाने बनते. नारळामध्ये पचनासाठी उपयुक्त असणारे फायबर मुबलक प्रमाणात असतात. तर तुपामध्ये त्वचेला तेज देणारे विटामिन ए आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड यासारखे घटक असतात. याशिवाय मोदकामध्ये वापरल्या जाणाऱ्या खोबऱ्यामध्ये आणि सुक्यामेव्यामध्ये मॅग्नीजचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हाडांचे पोषण व्हायला मदत होते.

पोह्यांचा चिवडा: 

एरवी दिवाळीला बनवला जाणारा पोह्यांचा चिवडा गणपतीच्या प्रसादाचा उत्तम पर्याय ठरू शकतो. या चिवड्यामध्ये पोहे, शेंगदाणे, डाळ, खोबरं, मनुका, कडीपत्ता,लसूण हे प्रमुख घटक टाकले जातात. यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लोह,फायबर, असे अनेक उपयुक्त घटक मिळतात. थोडक्यात सांगायचं तर, एकाच वेळी अनेक पोषक घटक शरीराला पुरवण्याची ताकद चिवड्यामध्ये असते. 

फळांची खिरापत- 

चॉकलेट, कँडिज आणि पेस्ट्रिजच्या जमान्यात आपण हळूहळू फळांपासून दूर चालले आहोत. अशावेळी गणपतीच्या प्रसादात फळांचा समावेश केल्याने, रोजच्या आहारातील अँटिऑक्सिडंटची कमी आपण भरून काढू शकतो. याशिवाय फळांमधून विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन पद्धतीचे फायबर शरीराला मिळतात. विरघळणारे फायबर शरीरातील उपयुक्त सूक्ष्मजीवांचे पोषण करून शरीराला आजारांपासून दूर ठेवतात. याशिवाय शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करायला मदत करतात. आणि न विरघळणारे फायबर बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात. त्यामुळे यावर्षी गणपतीच्या प्रसादात रंगीबेरंगी फळांचा विचार करायला हरकत नाही.

खीर / हलवा -

पेढा आणि इतर मिठायांना पर्याय म्हणून खीर किंवा हलव्याचा विचार केला जाऊ शकतो. हे दोन्ही पदार्थ शरीराला आवश्यक असणारे कार्बोहायड्रेट्स मुबारक प्रमाणात पुरवू शकतात. खीर किंवा हलव्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सुक्यामेव्यांमधून लोह, मँगॅनीज, झिंक इत्यादी उपयुक्त घटक शरीराला मिळतात. याशिवाय हलव्यासाठी गाजर, दुधी,  रताळ, सफरचंद इत्यादी वेगवेगळ्या फळांचा वापर केल्यास विटामिन ए, सी, फायबर, अँटिऑक्सिडंट या घटकांचा लाभ होतो

पुरणपोळी -

गव्हाच्या पोळीमध्ये डाळ आणि गूळ यांचं सारण भरून तयार केलेली पुरणपोळी म्हणजे, कार्बोहायड्रेट आणि प्रथिने यांचा संगम. गणपतीच्या बऱ्याचदा फक्त जास्त कार्बोहायड्रेट असलेले गोड पदार्थ प्रसादासाठी निवडले जातात. अशावेळी त्यासोबत प्रोटीन्स म्हणजे प्रथिने देखील मिळाल्यास "सोने पे सुहागा"!! त्यामुळे यावर्षी प्रसादात शरीराची ताकद वाढवणाऱ्या पुरणपोळीचा समावेश करायला हरकत नाही.

वर सांगितलेल्या पदार्थांशिवाय, पंचखाद्याची खिरापत, गुळ शेंगदाणे, शेंगदाण्याचे लाडू, चिक्की, अळशीचे लाडू, सुकामेवा, पोह्यांची खिरापत, हे सोपे आणि आरोग्यदायी पदार्थ तुम्ही प्रसादात समाविष्ट करू शकता. अर्थात हे पदार्थ कितीही आरोग्यदायी असले तरी खाताना थोडा संयम बाळगला तर हा गणेशोत्सव आनंदासोबत आरोग्यदायीही ठरेल यात शंका नाही.

-आहारतज्ञ दिनराज मोहिनी आपोणकर

( लेखक आहारतज्ञ आणि जैवतंत्रज्ञ असून मातापोषण आणि बालकांची वाढ या विषयावर संशोधन करत आहेत. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.