हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. त्या महिन्यात त्या देवतांची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व संकट दूर होतात. आज गणेश चतुर्थी आहे. बुधवार असल्याने गणेश चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. बुधवार हा गणपतीला समर्पित असून या दिवशी गणेश चतुर्थी असल्याने या दिवशी उपवासाचे विशेष महत्त्व आहे.
आता सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. खरंतर बाप्पासाठी सजावट, मखर, नैवेद्य, आरतीची तयारी याची लगबग सुरू होते. गणपती बाप्पाच्या पुजेत महत्त्वाचं स्थान असतं ते म्हणजे ‘दुर्वां’ना. गणेश पुजनात बाप्पाला खास 21 दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत आहे. असं म्हणतात की, पुराणात अनालसुराला गिळून गणपतीने देवांची असूरांपासून सुटका केली होती. मात्र या असूराला गिळल्यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह होऊ लागला. तेव्हा गणपतीच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्यामुळे त्याला आराम मिळाला होता. तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वांची जुडी वाहण्याची पद्धत सुरू झाली. शिवाय बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत असंही म्हटलं जातं.
आता बघू या गणपतीला दुर्वा इतक्या प्रिय होण्याचे नेेमक काय आहे कारण?
एकदा मायावी शक्तीपासून अनलासुर नावाचा भयानक असुर उत्पन्न झाला. त्याच्या कानठळया बसविणाऱ्या आवाजाने पृथ्वीचाही थरकाप उडत होता. त्याचे डोळे लालबुंद होते. त्यांतून अग्नीच्या ज्वाळा निघत होत्या. त्याच्या वाऱ्यालाही कोणी उभे राहत नव्हते. या अनलासुराने देवांनाही दे माय धरणी ठायकरून सोडले होते. संपूर्ण देवलोक ह्या राक्षसाच्या अत्याचारामुळे भयभीत झाले होते.अखेर सर्व देव गणपतीला शरण गेले. त्यांनी गणपतीचा धावा करताच गणपती बालरूपात प्रकट झाला. गणपतीने देवांना अनलासुरापासून भयमुक्त करण्याचे अभिवचन दिले. अनलासुराविरूध्द युध्द पुकारले.
अनलासुराने बालरूपी गणपतीला गिळण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अनलासुरालाच गिळंकृत केले. त्या राक्षसाचा नाश तर झाला पण इकडे गणपतीच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. तो गडबडा लोळू लागला.त्यानं सर्वांगाला चंदनाचा लेप दिला. तरीही दाह काही थांबेना. तेव्हा देवांनी त्याच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली. त्यामुळे गणपतीला भालचंद्रअसे नाव पडले. विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले त्यामुळे त्यास पद्मपाणी असे नाव मिळाले. भगवान शंकराने आपल्या गळयातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला. वरूणाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला तरी अंगाची लाही काही थांबेना. गणपती बिचारा तळमळत जमिनीवर लोळत होता.
इतक्यात काही ऋषीमुनी तेथे आले. प्रत्येकाने एकवीस-एकवीस दुर्वांची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि चमत्कार झाला. गणपतीला तात्काळ बरं वाटलं. त्याच्या अंगाची आग शांत झाली. गणपती आनंदून म्हणाला, माझ्या अंगाची लाही शांत होण्यासाठी सर्व देवांनी नानाविध उपाय. केले, परंतु दुर्वांनी माझ्या अंगाचा दाह कमी झाला. यापुढे जो मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञयाग, व्रतं आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य लाभेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.