इराकमध्ये राजकीय अस्थिरतेचे वातावरण; हिंसाचारात ३० मृत्युमुखी

अल सद्र यांच्या समर्थकांकडून गोळीबार
30 killed in violence in Iraq Muqtada al-Sadr Iraq's influential leaderannounced his sudden retirement from politics
30 killed in violence in Iraq Muqtada al-Sadr Iraq's influential leaderannounced his sudden retirement from politicssakal
Updated on

बगदाद : इराकमधील प्रभावी नेते आणि शिया धर्मगुरु मुक्तादा अल सद्र यांनी राजकारणातून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर इराकमध्ये अनेक शहरांमध्ये हिंसाचार उफाळला आहे. अल सद्र यांचे समर्थक आणि इराकी सैन्य यांच्यात अनेक ठिकाणी चकमक सुरु झाली असून या संघर्षात आतापर्यंत तीस जणांचा मृत्यू झाला आहे. या घडामोडींमुळे इराकमध्ये राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराकमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

इराकमध्ये सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या राजकीय आघाडीला मुक्तदा अल सद्र यांनी काही दिवसांपूर्वी विरोध करत आंदोलन पुकारले. त्यानंतर त्यांचे हजारो समर्थक मागील चार आठवड्यांपासून इराकच्या संसदेत ठाण मांडून बसले आहेत. मात्र, अल सद्र यांनी सोमवारी अचानक राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा करत आपला पक्षही बरखास्त केला. यानंतर संभ्रमित झालेल्या त्यांच्या समर्थकांनी सरकारविरोधात हिंसक आंदोलन सुरु केले. इराकची राजधानी बगदाद येथील अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या ग्रीन झोन हाच हिंसाचाराचे केंद्र बनला आहे. या भागात इतर देशांचे दूतावास असून काही देशांनी आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना मायदेशी परतण्याची सूचनाही केली आहे.

अल सद्र यांच्या समर्थकांनी मशिन गन आणि रॉकेट बाँबचा वापर करत इराकी सैन्यावर हल्ले केले. त्यांनी ग्रीन झोनची संरक्षक भिंतही काही ठिकाणी पाडून टाकली. त्यांना रोखण्यासाठी इराकी सैन्यालाही त्यांच्यावर गोळीबार केला. या भागात रणगाडेही तैनात करण्यात आले आहेत. या संघर्षात किमान ३० जणांचा मृत्यू झाला असून चारशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.

इराकमधील संघर्षस्थिती

  • हिंसाचार अधिक वाढण्याची शक्यता

  • इराकच्या सर्वोच्च धार्मिक नेत्याने इराणला पाठिंबा दिल्याने संताप; इराण-इराक सीमा बंद

  • इराकच्या अनेक शहरांमध्ये संचारबंदी

  • कुवेतचे आपल्या नागरिकांना इराक सोडण्याचे आवाहन

  • नेदरलँडच्या अधिकाऱ्यांनी दूतावास सोडला

  • अनेक विमान उड्डाणे रद्द

संघर्षामागील कारण

गेल्या वर्षी निवडणूकीत मुक्तदा अल सद्र यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, सत्ता स्थापनेसाठी जागा कमी पडत असल्याने हंगामी सरकार स्थापन झाले होते. आघाडी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असताना इराणचा पाठिंबा असलेल्या शिया गटांनी आघाडी करत सत्ता स्थापनेचा दावा केला. या आघाडीला अल सद्र यांचा विरोध आहे. सद्दाम हुसेन यांच्या सत्ताकाळात शिया गटांना दबावाखाली ठेवण्यात आले होते. मात्र, अमेरिकेने त्याचा पराभव केल्यानंतर शिया गटांना सामर्थ्य मिळाले आणि त्यांच्यातच संघर्ष सुरु झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.