Sheikh Hasina : सर्वाधिककाळ सत्ता उपभोगणाऱ्या ‘आयर्न लेडी’चा देशत्याग

सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारी महिला अशी जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेल्या शेख हसीना यांची राजकीय कारकीर्द अनेक स्थित्यंतरांमुळे मोठी नाट्यमय ठरली आहे.
Sheikh Hasina
Sheikh Hasina sakal
Updated on

शेख हसीना यांची कारकीर्द

सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारी महिला अशी जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेल्या शेख हसीना यांची राजकीय कारकीर्द अनेक स्थित्यंतरांमुळे मोठी नाट्यमय ठरली आहे. बांगलादेशमध्ये सलग चारवेळा आणि एकूण पाच वेळा सत्ता मिळविण्यात यशस्वी झालेल्या शेख हसीना यांनी एकेकाळी लष्कराचे वर्चस्व असलेल्या बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण केली असे मानले जाते. मात्र त्या हुकूमशहा असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात आला आहे.

प्रचंड लोकप्रियतेच्या जोरावर सलग १५ वर्षे बांगलादेशात सत्तेत राहून अखेर जनक्षोभामुळे देशातून पलायन करावे लागले आहे आढावा.

तरुण वयात राजकारणात प्रवेश

बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजिबूर रेहमान यांची कन्या असलेल्या शेख हसीना यांचा जन्म सप्टेंबर १९४७मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानात झाला. ढाका विद्यापीठात शिक्षण सुरू असतानाच वयाच्या २३ व्या वर्षी त्या राजकारणात सक्रिय झाल्या. बांगलादेश मुक्तिसंग्रामात त्यांचे वडील रेहमान हे तुरुंगात असताना त्यांच्या प्रवक्त्या म्हणून शेख हसीना यांनी काम केले. त्यानंतर १९७१ मध्ये स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतर रेहमान यांच्याकडे पंतप्रधानपद आले. १९७५मध्ये रेहमान, त्यांची पत्नी आणि तीन मुलांची लष्कराच्या अधिकाऱ्यांनी हत्या केली. यावेळी शेख हसीना आणि त्यांची बहीण रेहाना या परदेशात असल्याने बचावल्या. रेहमान यांच्या हत्येनंतर त्यांनी स्थापन केलेल्या आवामी लीग या पक्षाचे प्रमुख पद हसीना यांना देण्यात आले. त्यानंतर १९८१मध्ये त्या बांगलादेशात परतल्या. बांगला देशात परतल्यावर त्यांनी येथील लष्करी राजवटीचा कडाडून विरोध केला. देशात लोकशाही यासाठी त्यांनी लोकांमध्ये जात अनेक आंदोलने केली. त्यामुळे त्यांना अनेकदा स्थानबद्धही करण्यात आले.

निवडणुकीत सहभाग

शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाने १९९१मध्ये बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभाग घेतला मात्र त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. त्यांच्या विरोधक खालिदा झिया यांना पंतप्रधानपद मिळाले. मात्र १९९६मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांचा विजय झाला आणि त्यांना पंतप्रधानपद मिळाले. त्यानंतर २००१मध्ये त्यांचा पुन्हा पराभव झाला. त्यानंतर २००८मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हसीना या पुन्हा विजयी झाल्या. त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये हसीना यांनी विजय मिळवत सत्ता स्वतःकडे ठेवली. त्यांच्या सरकारने २०१३मध्ये बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाशी निगडित जमाते इस्लाम या संघटनेवर निवडणुकीत सहभागी होण्यास बंदी घातली.

२०२४च्या निवडणुकीवर येथील विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. तेव्हापासूनच बांगलादेशात राजकीय वातावरण तापले होते. मागील काही दिवसांपासून येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने हसीना यांच्या विरोधातील जनमताचा स्फोट झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.