काबूल विमानतळावर मोठा दहशतवादी हल्ला होण्याचा ब्रिटनने दिलेला इशारा खरा ठरलाय. विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ दहशतवाद्यांनी किमान तीन स्फोट घडवून आणले.
लंडन- काबूल विमानतळावर मोठा दहशतवादी हल्ला होण्याचा ब्रिटनने दिलेला इशारा खरा ठरलाय. विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ दहशतवाद्यांनी किमान तीन स्फोट घडवून आणले. या हल्ल्यांमध्ये लहान मुलांसह किमान 70 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेक जण जखमी झाल्याचा अंदाज अमेरिकेने व्यक्त केला आहे. हे आत्मघाती हल्ले असल्याचा दावा करण्यात येत आहे. तालिबानने अफगाणिस्तानची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेमध्ये स्फोटांमुळे भर पडली आहे.
काबूल विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांवर मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा ‘इसिस’ या संघटनेने कट आखल्याची खात्रीलायक माहिती असल्याचा इशारा ब्रिटनने दिला होता. विदेशी नागरिकांना विमानतळावर येण्यापासून रोखण्यासाठी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. विमानतळाच्या एका प्रवेशद्वारावर नागरिकांची गर्दी असताना तिथेच मोठा बाँबस्फोट झाला. या स्फोटानंतर गोळीबार झाल्याचाही दावा करण्यात आला. हल्ल्यात किमान 70 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यामुळे विमानतळावर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली. हा आत्मघाती हल्ला असल्याची शंका अमेरिकेने व्यक्त केली आहे. या हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात नेले जात असतानाच आणि हल्ल्याबाबत माहिती गोळा केली जात असतानाच विमानतळाजवळ असलेल्या ‘बॅरन’ या हॉटेलमध्ये आणखी एक स्फोट झाला.
पाकवर टीका
काबूलमध्ये स्फोट झाल्यानंतर आणि या हल्ल्यांमागे ‘इसिस’चा हात असल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतरही या परिस्थितीला पाकिस्तानच जबाबदार असल्याची टीका अफगाण जनतेमधून होत आहे. पाकिस्तानमुळे अस्थिर वातावरण निर्माण होत आहे, असे नागरिकांबरोबर काही तज्ज्ञांचेही मत असून हल्ल्यांना पाकिस्तानचीच फूस असल्याचा आरोपही केला जात आहे. तसेच, स्फोटानंतर अफगाणिस्तानात पुन्हा एकदा यादवी सुरु होण्याची चिन्हे दिसत असल्याचेही काही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
‘इसिस-के’वर संशयाची सुई
हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर त्याची अपेक्षा असूनही विमानतळावर अद्यापही हजारो नागरिक विमानाच्या प्रतिक्षेत असताना हे दोन हल्ले झाल्याने जगाला धक्का बसला आहे. अनेक देशांचे नागरिक अद्यापही विमानतळावर किंवा काबूल शहरात अडकून पडले असताना, या हल्ल्यांमुळे त्यांची सुटका करण्याच्या मोहिमेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमानतळाबाहेर तालिबानी दहशतवादी मोठ्या संख्येने असले तरी संशयाची सुई ‘इसिस’शी संलग्न असलेल्या ‘इसिस-के’ या संघटनेकडेच असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नागरिकांना आधीच केले सावध
हल्ल्याची शक्यता व्यक्त करताना ब्रिटन सरकारने अफगाणिस्तानमधील आपल्या नागरिकांना काबूल विमानतळापासून दूर सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला दिला होता तसेच, त्यांना लवकरच पुढील सूचना दिली जाईल, असेही त्यांना कळविण्यात आले होते. ब्रिटनप्रमाणेच अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क या देशांनीही काबूलमधील आपल्या नागरिकांना असाच इशारा दिला होता. अफगाणिस्तानमध्ये ‘इसिस’कडून हल्ला होण्याचा धोका वाढत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही काही दिवसांपूर्वी सांगितले होते. ब्रिटनचे मंत्री जेम्स हेॲप्पी यांनी ‘बीबीसी’शी बोलताना काबूल विमानतळावर हल्ला होण्याचा ‘इसिस’चा कट असल्याचे सांगितले. ‘गुप्तचर विभागाकडे या हल्ल्याच्या कटाबाबत अत्यंत खात्रीशीर माहिती आहे. विमानतळाबाहेर जमलेल्या नागरिकांना लक्ष्य करण्याचा ‘इसिस’चा डाव आहे,’ असे हेॲप्पी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.