काबुल - अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबान आता सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहे. मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात येत आहेत. काही हंगामी मंत्र्यांची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. आता अल जजिराने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानने जगातील सर्वात धोकादायक तुरुंगातील कैद्याला संरक्षण मंत्री केलं आहे. क्युबातील ग्वांटानामो तुरुंगात अमेरिकेने दहशतवादी मुल्ला अब्दुल कय्यूम झाकिर याला सहा वर्षे डांबून ठेवलं होतं. आता त्याच्याकडे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रीपदाची सूत्रे सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मुल्ला अब्दुल कय्यूम झाकिर हा एक अनुभवी असा तालिबानी कमांडर आहे. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा विश्वासू असा सहकारी आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर 2001 मध्ये अमेरिकन सैन्याने मुल्ला अब्दुल कय्यूम झाकिरला पकडलं होतं. त्यानंतर 2007 पर्यंत त्याला ग्वांटानामोच्या खाडीतील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. पुढे त्याची सुटका झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या ताब्यात दिलं होतं.
मुल्ला अब्दुल हा तालिबानच्या सर्वात क्रूर अशा दहशतवाद्यांपैकी एक समजला जातो. ग्वांटानामो खाडीत अमेरिकन सैन्याचा एक अति सुरक्षा असलेला तुरुंग आहे. क्युबात असलेल्या या तुरुंगात क्रूर आणि हाय प्रोफाइल दहशतवाद्यांना ठेवलं जातं. इथंच मुल्ला अब्दुलला सहा वर्षे ठेवलं होतं.
तालिबानने अद्याप अधिकृतपणे सरकार स्थापन केलेलं नाही. मात्र देश चालवण्यासाठी दहशतावद्यांच्या समुहाने त्यांच्या काही नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात हाजी मोहम्मद इदरीसला देशाची केंद्रीय बँक द अफगाणिस्तान बँकेचा काळजीवाहू प्रमुख नेमलं आहे.
अफगाणिस्तानमधील स्थानिक न्यूज चॅनेलनुसार, तालिबानने सखउल्लाहला शिक्षण प्रमुख, अब्दुल बाकीला उच्च शिक्षण प्रमुख, सदर इब्राहिमला गृहमंत्री, गुल आगाला अर्थमंत्री, मुल्ला शिरीनकडे काबुलच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी दिली आहे. तसंच हमदुल्ला नोमानीला काबुलचा महापौर आणि नजीबुल्लाहला गुप्तचर प्रमुख केलं आहे. तालिबानने याआधी त्यांचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदला संस्कृती आणि माहिती मंत्री म्हणून नियुक्त केलं होतं. त्यानेच तालिबान सरकार कसं असेल याची माहिती माध्यमांसमोर दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.