काबुल - अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. अमेरिकेनं सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु करताच तालिबानने एक एक करत सर्व प्रांत ताब्यात घेतले आहेत. काबुलसह सर्व मोठी शहरं आता तालिबानच्या ताब्यात आहेत. अफगाणिस्तानचे सैन्य आणि पोलिस तालिबानसमोर निष्प्रभ ठरत आहे. गेल्या 20 वर्षात जे काही अफगाणिस्तानने कमावलं होतं ते फक्त 4 महिन्यात धुळीस मिळालं आहे. अमेरिकेनं हात वर करताच तालिबानी आक्रमक झाले. राष्ट्रपती अशरफ गणी यांनीही देश सोडला आहे.
अफगाणिस्तानचे शसस्त्र बल तालिबानसमोर शरण आले आहेत. मे महिन्यात सुरु झालेला हिंसाचार वीसएक शहरं ताब्यात घेऊन आणि अफगाण लष्कराला नामोहरम करत काबुलपर्यंत पोहोचला आहे. कंदाहार, हेरात ही मोठी शहरेसुद्धा तालिबानने ताब्यात घेतली आहेत. दरम्यान, यामुळे एक प्रश्न उपस्थित होतोय. तो म्हणजे गेल्या 20 वर्षात अफगाणिस्तानच्या लष्कराला प्रशिक्षणासाठी, उपकरणे, शस्त्रे यासाठी जवळपास 6 लाख कोटींचा खर्च अमेरिकेने केला आहे. इतका पैसा खर्च केल्यानंतरही तालिबानसमोर अफगाणिस्तान चार महिनेसुद्धा टिकाव का धरु शकला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी अफगाणिस्तानच्या लष्कराला सक्षम करण्यासाठी योजना तायर केली होती.
अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये लष्कराची स्थापना केली पण त्याचा फायदा होऊ शकला नाही. कोट्यवधी रुपये खर्चूनही तालिबानला हे लष्कर रोखू शकलं नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची घोषणा केल्यापासून तिथली परिस्थिती बिघडली. सध्या अमेरिका त्यांच्या सर्व सैनिकांना लवकरात लवकर तिथून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी आणखी 5 हजार सैनिक त्यांच्याकडून पाठवण्यात आले आहेत.
तालिबानी वर्चस्वाचा प्रवास
१४ एप्रिल ः अमेरिका आणि अफगाणिस्तानात झालेल्या करारानुसार अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी १ मेपासून सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली.
४ मे ः एक मेपासून अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तानातून माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर लगेच ४ मेपासून तालिबान्यांनी अफगाणी सैन्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. जवळच्या सहा प्रांतांवर हल्ला केला.
११ मे ः तालिबानने देशभरात हिंसाचाराला सुरुवात करत राजधानी काबुल शहरापासून जवळच असलेल्या नेरख प्रांतावर ताबा मिळवला.
७ जून ः उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गत २४ तासांत १५० अफगाण सैनिकांना तालिबान्यांकडून मारण्यात आले. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशातील ३४ पैकी २६ प्रांतांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
२२ जून ः तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील उत्तर प्रांतात एकामागून एक हल्ले करण्यास सुरुवात केली. संयुक्त राष्ट्राच्या अफगाणविषयक समितीने दिलेल्या माहितीनुसार, तालिबान्यांनी ३७० पैकी ५० जिल्ह्यांवर ताबा मिळवला आहे.
२ जुलै ः काबुल शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या अफगाणिस्तानातील सर्वात मोठ्या बग्राम लष्करी तळावरून अमेरिकन सैनिकांनी माघार घेतली. अशा प्रकारे अमेरिकेची अफगाणिस्तानातील लष्करी मोहिमेचा शेवट झाला.
५ जुलै ः ऑगस्ट महिन्यापर्यंत आम्ही अफगाण सरकारला लेखी स्वरूपात शांतता प्रस्ताव सादर करू, अशी घोषणा तालिबानने केली.
२१ जुलै ः अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबान्यांनी जवळपास निम्म्या देशावर कब्जा मिळवला.
२५ जुलै ः तालिबान्यांविरोधात लढण्यासाठी अफगाण सैन्याला मदत करण्याचे वचन अमेरिकेने दिले. त्यासाठी काही प्रमाणात अमेरिकेने तालिबान्यांवर हवाई हल्ले केले.
२६ जुलै ः मे आणि जून महिन्यात जवळपास २४०० अफगाणी नागरिक तालिबान्यांच्या हल्ल्यात मारले गेले किंवा जखमी झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने दिली. २००९ नंतर प्रथमच अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली.
६ ऑगस्ट ः अफगाणिस्तानच्या दक्षिण प्रांतातील झरंज ही पहिलीच राजधानी तालिबानच्या ताब्यात गेली. मागोमाग एक प्रांतीय राजधान्यांवर तालिबान्यांनी कब्जा मिळवण्यास सुरुवात केली.
१३ ऑगस्ट ः अफगाणिस्तानातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या कंदहारसह देशातील आणखी प्रमुख चार प्रांतीय राजधान्यांवर तालिबान्यांनी ताबा मिळवला.
१४ ऑगस्ट ः तालिबान्यांनी राजधानी काबुलच्या नजीक येऊन ठेपली. तोपर्यंत त्यांनी उत्तरेकडील प्रमुख शहर मझर-ए-शरीफ, लॉगर प्रांताची राजधानी पूल-ए-आलम शहरावरही ताबा मिळवला. अमरिकन नागरिकांच्या सुटकेसाठी अमेरिकेने खास पथक अफगाणिस्तानात रवाना केले.
१५ ऑगस्ट ः अखेर तालिबान्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर ताबा मिळवला आणि राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी देश सोडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.