काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने वर्चस्व मिळविल्यापासून आतापर्यंत सुमारे पाच लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाल्याची धक्कादायक माहिती आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने दिली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळविला. त्यानंतर, अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था मोडकळीला आली असून लाखोजणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याचा दावाही संघटनेने केला. त्याचप्रमाणे, यावर्षीच्या मध्यापर्यंत अफगाणिस्तानात रोजगारांच्या बाबत महिलांची स्थितीही खराब होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की तालिबानची सत्ता आल्यापासून अफगाणिस्तानात पाच लाख जणांनी रोजगार गमाविले असून महिलांच्या काम करण्यावर निर्बंध आल्याने हा आकडा नऊ लाखांवरही जाऊ शकतो. अफगाणिस्तानात जागतिक मानकांच्या तुलनेत रोजगार करणाऱ्या महिलांची संख्या अतिशय कमी आहे. गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत महिलांच्या रोजगारांत १६ टक्क्यांनी घट झाली. या वर्षीच्या मध्यापर्यंत ही टक्केवारी २१ ते २८ टक्क्यांदरम्यान जाऊ शकते, असेही यात नमूद केले आहे.
अफगाणिस्तानात कृषी व नागरी सेवांमध्ये तसेच बांधकाम क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. देशातील अनेक पायाभूत प्रकल्पांची उभारणी ठप्प झाली आहे. नागरिकांबरोबरच सुरक्षा दलांतील जवान, अधिकाऱ्यांवरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
आंतरराष्ट्रीय समुदायाला साकडे
अफगाणिस्तानमध्ये तालिबानसारख्या कडव्या दहशतवादी संघटनेची सत्ता आल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानचा निधी रोखला. मात्र, तातडीने आर्थिक मदत पुरविली न गेल्यास अफगाणिस्तानात अनेक कारखाने बंद पडून १५ लाख जण बेरोजगार होऊ शकतात. त्यामुळे, अफगाणिस्तानमधील उद्योजकांनी निधी पुरविण्याची मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे. अफगाणिस्तानला निधी न दिल्यास देशातील अनेक उद्योग पूर्णपणे बंद होण्याची भीती चेंबर ऑफ माइन्स अँड इंडस्ट्रीजचे प्रमुख शेरबाझ कमिनझादा यांनी व्यक्त केली.
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून प्रमुख क्षेत्रांचे मोठे नुकसान झाले असून लाखो जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून देशाचे पुनरुज्जीवन आणि स्थिरतेसाठी या देशाला तत्काळ मदतीची गरज आहे. अफगाणिस्तानात तातडीने मानवतावादी गरजा पूर्ण करण्यास प्राधान्य द्यायला हवे.
- रहीम बेहझद, वरिष्ठ समन्वयक, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.