मॉस्को : रशियामध्ये नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे व्लादीमिर पुतीन यांचा विजय झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पहिलीच प्रतिक्रिया देताना पुतीन यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध लवकरच संपण्याची शक्यता मावळली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
रशियातील निवडणुकीत पुतीन यांना कोणी तुल्यबळ विरोधकच नसल्याने त्यांचा विजय स्पष्टच होता. एकूण मतदानापैकी पुतीन यांना ८७.२९ टक्के मते पडली. या विजयामुळे पुतीन यांना अध्यक्षपदावर आणखी सहा वर्षांचा कार्यकाळ मिळाला आहे. पुतीन हे डिसेंबर १९९९ पासून रशियात अध्यक्ष किंवा पंतप्रधान अशा पदांवर असून सलग पाचव्यांदा त्यांच्या हातात देशाची सूत्रे आली आहेत. निवडणुकीत प्रचंड मतदान झाले असून जनतेचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे याद्वारे सिद्ध होत असल्याचा दावा पुतीन यांनी केला आहे.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना पुतीन म्हणाले,‘‘भविष्यात आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र, आपण ज्यावेळी सर्वजण एकत्रितपणे लढतो, तेव्हा कोणीही आपल्याला भयभीत करू शकत नाही. अशा लोकांना भूतकाळातही अपयश आले आहे आणि भविष्यातही अपयशच येईल.’’ अमेरिका आणि ‘नाटो’ संघटनेलाही इशारा देताना पुतीन यांनी, रशिया आणि ‘नाटो’ यांच्यात थेट संघर्ष म्हणजे जग तिसऱ्या महायुद्धापासून केवळ एक पाऊल अंतरावर असल्याचा इशाराही पुतीन यांनी दिला आहे.
रशियाच्या नजीक असलेल्या स्वीडनला आपल्यात सामील करून घेणाऱ्या ‘नाटो’चे युक्रेनलाही सहभागी करून घेण्याचे प्रयत्न असून याला रशियाचा तीव्र विरोध आहे. युक्रेनवर हल्ला करतानाही त्यांनी हेच कारण दिले होते. त्यामुळे ‘नाटो’शी थेट संघर्ष करण्यास रशिया सज्ज असल्याचा, मात्र त्यामुळे तिसरे महायुद्ध भडकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अर्थात, अशी परिस्थिती कोणत्याही देशाला नको असेल, असे म्हणत त्यांनी ‘नाटो’लाही इशारा दिला आहे. फेरनिवडीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांचे अभिनंदन केले आहे.
विरोधाचा आवाजच नाही
रशियामध्ये पुतीन यांच्याविरोधात आवाज उठविणाऱ्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप आहे. रशियामध्ये निष्पक्ष माध्यमांवरही प्रचंड बंधने असल्याचा आरोप आहे. पुतीन यांचे कट्टर राजकीय विरोधात अलेक्सी नवाल्नी यांचा मागील महिन्यात तुरुंगात मृत्यू झाला होता. पुतीन यांचे अनेक विरोधक देश सोडून निघून गेले आहेत. निवडणुकीत मतदारांसमोर पुतीन यांच्याव्यतिरिक्त पर्यायच उपलब्ध नसतो. तटस्थ निरीक्षकांना फारसा वाव दिला जात नसल्याचे दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.