Dhaka Voilance: बांगलादेशातील आरक्षण आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागल्यानंतर देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शेख हसीना यांच्या सरकारने संवेदनशील भागांमध्ये लष्करी तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. या हिंसाचारामध्ये विविध ठिकाणांवर १०५ लोक मरण पावले असून दीड हजारांपेक्षाही अधिक लोक हे जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे सरचिटणीस ओबेदुल कादर यांनी आज देशव्यापी संचारबंदीची घोषणा केली. स्थानिक प्रशासनाला काम करणे अधिक सुलभ व्हावे म्हणून ही संचारबंदी लागू केली जात असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. देशातील शाळा, महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आली आहेत.
राजधानी ढाक्यामध्ये आंदोलन करण्यास मज्जाव करण्यात आला असताना देखील अनेक ठिकाणी बेकायदा जमलेल्या आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला, यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली होती. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करताना लाठीहल्लाही केल्याने या आंदोलनाचे लोण देशभर पसरले.
बांगलादेशातील आरक्षणाला आक्षेप घेत शेकडो विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या असून या आंदोलनामुळे अनेक भागांमध्ये अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेश मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाइकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात येणाऱ्या आरक्षणावरून हे आंदोलन पेटले आहे. अनेक विद्यार्थी संघटनांनी या आरक्षणाला आक्षेप घेतला आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर चारशे भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून आणखी पंधरा हजार नागरिक त्या देशात सुरक्षितपणे वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले.
देशातील आरक्षणप्रणाली विषमतामूलक असून ती पंतप्रधान शेख हसीना यांच्या ‘अवामी लीग’ पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना लाभदायी ठरणारी असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे. ‘बांगलादेश मुक्ती संग्रामा’मध्ये अवामी लीग पक्षाचे मोठे योगदान होते. त्यासाठीच हे आरक्षण लागू करण्यात आल्या आरोप होतो आहे. आरक्षण देताना मेरिटवर आधारित प्रणालीचा वापर करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली आहे.
शेख हसीना यांनी मात्र या आरक्षण व्यवस्थेचे समर्थन केले असून स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाइकांना सन्मान मिळायलाच हवा असे त्यांनी म्हटले आहे. या आंदोलनाला गुरूवारी हिंसक वळण लागले होते. काही आंदोलकांनी ढाक्यातील सरकारी वृत्तवाहिनीच्या मुख्यालयास आग लावली होती.या आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून शहरातील मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती.
- अनेक माध्यमांची संकेतस्थळेही बंद
- वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणात आडकाठी
- मध्यवर्ती बँकेच्या संकेतस्थळावर हल्ला
- पंतप्रधान कार्यालयाची साइटही हॅक
- नरसिंगदी जिल्ह्यात तुरुंगावर आंदोलकांचे हल्ले
- हिंसाचारावर भाष्य करण्यास भारताचा नकार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.