अशरफ घनी: माणूस तसा चांगला, पण...

अशरफ घनी यांनी २०१४ मध्ये काबूलच्या अध्यक्षीय प्रासादात पाऊल ठेवल्यावर सर्वप्रथम धूळ खात पडलेल्या शाही ग्रंथालयाचा कायापालट केला
ashraf gani
ashraf ganisakal
Updated on

अशरफ घनी यांनी २०१४ मध्ये काबूलच्या अध्यक्षीय प्रासादात पाऊल ठेवल्यावर सर्वप्रथम धूळ खात पडलेल्या शाही ग्रंथालयाचा कायापालट केला. त्यांना वाचनाचा एवढा छंद होता की त्यांच्या निवासस्थानी ठिकठिकाणी टेबलावर पुस्तके, बुकमार्कचा खच पडलेला असायचा. अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून वेळ काढून घनी ‘हरम सराई पॅलेस’ बगिच्यात चिनार वृक्षाखाली शांतपणे पुस्तके वाचत दिसायचे. दररोज नित्यनियमाने ते दोन ते तीन तास वाचन करायचे.तलवारीने इतिहास लिहिल्या गेलेल्या अफगाणिस्तानचा हा वेगळाच अध्यक्ष होता.

अशरफ घनी यांच्यावर दुसऱ्यांदा काबूल सोडून पळण्याची वेळ आली. १९७७ मध्ये कम्युनिस्टांची राजवट प्रस्थापित होत असताना त्यांनी कुटुंबासह काबूल सोडले. दुसऱ्यांदा अफगाणिस्तानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी देशाबाहेर पळ काढला. गरज असताना अफगाणिस्तानच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडून पळणारा पळपुटा अध्यक्ष म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली आहे.

ashraf gani
अफगाणिस्तान दुहेरी संकटात; नागरिकांवर भूकबळीचे सावट- WHO

हमीद करजई यांच्या अध्यक्षपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात अफगाणिस्तानात भ्रष्टाचार वाढला, युद्धखोरांचे फावले. या परिस्थितीत घनी यांच्याकडे सत्तेची सूत्रे आली. त्यांनी हमीद करजई सरकारमध्ये, सल्लागार, अर्थमंत्री या पदांवर काम केले. स्पष्टवक्तेपणा, तापट स्वभाव आणि भ्रष्टाचाराला विरोध या त्यांच्या उपजत स्वभावामुळे त्याचे मंत्रिमंडळात फारसे कुणाशी जमले नाही.

अशरफ घनी यांचे अध्यक्ष हमीद करजई यांच्यासोबत नेहमी खटके उडायचे.त्यांनतर अनेकदा घनी पदाचा राजीनामा द्यायचे. मात्र घनीसारखा प्रामाणिक, काम करणारा दुसरा माणूस उभ्या अफगाणीस्तान सापडणार नाही हे करजईना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे घनी यांना ते सांभाळून घायचे.

ashraf gani
अफगाणिस्तान : मुलींच्या शिक्षणाबाबत तालिबानचा पहिला फतवा

अशरफ घनी यांना भ्रष्टाचाराचा तिटकारा होता.एकदा संरक्षण मंत्री मोहम्मद फहीम हे कामाला नसलेल्या १० हजार सैनिकांच्या नावाने त्यांचा पगार उचलत असल्याचे उघडकीस आल्यावर त्यांनी थेट संरक्षण मंत्रालयाच्या अनुदानात कपात केली. संतप्त फहीम थेट राष्ट्राध्यक्ष करजई यांच्याकडे गेले. मी घनींना ठार मारेन, असे त्यांनी संतापाने म्हटले. करजई हसून म्हणाले, घनींना मारण्याची इच्छा असलेल्यांची यादी खूप लांबलचक आहे. तुझा नंबर दूर आहे. करजई हे कार्यालयात सर्वांना भेटायचे, सरदारांना वेळ द्यायचे, लोकांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी प्रसंगी अमेरिकन डॉलर भरलेल्या बॅगा वाटायचे.

घनी यांचा स्वभाव बिलकूल विरुद्ध होता. ते करजईसारखे धूर्त नव्हते. विकास प्रकल्प, अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीत त्यांना रस होता. प्रकल्पाचे बारकावे समजून घेऊन त्यावर टिपण लिहिण्याची त्यांची सवय होती. राजकीय नेत्यांना ते फारसा वेळ देत नसायचे. जनतेत रमण्यापेक्षा पुस्तके वाचायला त्यांना आवडायचे. नव्वदच्या दशकात त्यांना पोटाचा कर्करोग झाल्यानंतर त्यांचा स्वभाव अधिकच तापट झाला होता. या स्वभावामुळे घनी यांचे मित्र कमी आणि दुश्मन जास्त झाले.

ashraf gani
अफगाणी नागरिकांना या १३ देशांत मिळणार आसरा

अफगाणच्या राजकारणावर दबदबा असलेल्या एका प्रतिष्ठित पश्तून कुटुंबात घनी यांचा जन्म झाला. लष्करी अधिकारी असलेल्या घनी यांच्या आजोबांनी राजे नादीर यांना सत्तेवर बसवण्यात महत्त्वाची भूमिका वठवली होती, तर त्यांचे वडील राजे झाहीर यांच्या सरकारमध्ये अधिकारी पदावर होते. घनी यांच्या रक्तातच राजकारण, सत्ता होती. सत्ता गाजवणे हा त्यांचा स्वभाव नव्हता.

१५ ऑगस्टला काबूलचा पाडाव केल्यानंतर घनींनी अफगाणिस्तान सोडले. घनी आपल्यासोबत लाखो अमेरिकन डॉलर, चार पॉश कार, हेलिकॉप्टर घेऊन गेल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या; मात्र अशरफ घनींना पैशापेक्षा पुस्तकांचा मोह अधिक आहे. हे अनेकांना चांगलेच ठाऊक आहे. १२ वर्षांच्या कार्यकाळात हमीद करजई यांनी कोट्यवधी डॉलरची संपत्ती जमवली. त्या तुलनेत घनी तसे गरीबच म्हणावे लागेल. त्यांची एकूण संपत्ती चार दशलक्ष डॉलर एवढी आहे. त्यामध्ये काबूलमधील चार एकरवरचा बंगला आणि सात हजार पुस्तकांचा समावेश आहे.

ashraf gani
काबूलमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी विमानोड्डाणाला परवानगी

देश सोडल्यानंतर घनी यांच्यावर जगभरातून टीका झाली; मात्र मला विजेच्या खांबावर लटकवलेला दुसरा अफगाणी राष्ट्राध्यक्ष व्हायचे नव्हते, असं म्हणत घनी यांनी काबूल सोडल्याचे समर्थन केले.

१९९६ मध्ये काबूलचा पाडाव झाल्यानंतर अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नजीबुल्ला यांनी जीव वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या इमारतीत आश्रय घेतला. तालिबानींनी तिथून ओढून काढत नजीबुल्ला यांना विजेच्या खांबावर जाहीर फाशी दिली. काही दिवस त्यांचा मृतदेह तसाच लटकत होता; मात्र या वेळी तसे झाले असते का, याचे उत्तर आजतरी देता येणार नाही.

अशरफ घनी हे व्यवसायाने उच्च प्रशिक्षित मानवंशशास्त्रज्ञ आहेत. बैरुतमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. तिकडेच ख्रिश्चन असलेल्या रुला यांच्या ते प्रेमात पडले. दोघांनी लग्न केले. मरियम आणि तेरेक नावाची दोन मुले आहेत. दोघेही अमेरिकेत राहतात. अशरफ घनी यांनी दोन दशके बर्कले, जॉन हापकिंग, कोलंबियासारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात शिकवण्याचे काम केले. जागतिक बँकेच्या थिंक टँकमध्ये त्यांनी काम केले.

चीन, रशिया आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे ते तज्ज्ञ होते. ‘फिक्सिंग फेल स्टेट’ या गाजलेल्या पुस्तकाचे ते लेखक. व्यवस्थाहीन, वांशिक हिंसाचार आणि उद्‍ध्वस्त अर्थव्यवस्था असलेल्या देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी काय केले पाहिजे याची विस्तृत थेअरी त्यांनी या पुस्तकातून मांडली.

२०१४ मध्ये काबूलच्या अध्यक्षीय प्रासादात पाऊल ठेवल्यावर घनी यांनी सर्वप्रथम धूळखात पडलेल्या शाही ग्रंथालयाचा कायापालट केला. करजई त्यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात या ग्रंथालयाकडे फिरकलेही नव्हते. घनी यांना वाचनाचा एवढा छंद होता की, त्यांच्या निवासस्थानी ठिकठिकाणी टेबलावर पुस्तके, बुकमार्क विखुरलेली असायची. अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून वेळ काढून घनी ‘हराम सराई पॅलेस’ बगिच्यात चिनार वृक्षाखाली शांतपणे पुस्तके वाचताना दिसायचे. सकाळी ५ वाजता उठल्यानंतर ते दोन ते तीन तास वाचन करायचे.

ashraf gani
अमेरिकेकडून ३७ कोटींचे इनाम असलेला दहशतवादी फिरतोय काबूलच्या रस्त्यावर

अध्यक्ष असूनही तसे राजकारणापासून अलिप्तच होते. सत्ता चालवायची असेल तर तिथल्या शक्तिशाली सरदारांना सोबत घेऊन चालावे लागते. भ्रष्टाचार नजरेआड करावा लागतो; मात्र घनींना त्याचा तिटकारा होता. एकदा हेरातचे मोठे नेते इस्माईल खान त्यांना भेटायला आले. घनी यांनी इस्माईल खान यांना मोजून १५ मिनिटे दिली. इस्माईल खान यांच्याकडे तुम्ही बघा अथवा दुर्लक्ष करा; मात्र त्यांना एवढा कमी वेळ देऊ नका, असा निर्वाणीचा सल्ला घनी यांच्या सल्लागाराने त्यांना दिला.

भ्रष्टाचारी इस्माईल खान १५ मिनिटांच्या लायकीचा आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा करताच अस्थिर अफगाणिस्तान टिकवण्यासाठी अशरफ घनी यांना त्याच भ्रष्ट सरदारांशी जुळवून घेण्याची वेळ आली; मात्र या वेळी त्या सरदारांनी तालिबानींशी डिल केल्याचे अशरफ घनी यांच्या लक्षात आलेच नाही. शेवटच्या काही महिन्यांत घनी यांचा प्रशासकीय अंमल केवळ काबूलपर्यंत मर्यादित होता.

ashraf gani
150 भारतीयांचं अपहरण केलं नाही - तालिबानचे स्पष्टीकरण

तालिबानच्या शक्तीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यांच्या हेकेखोर स्वभावामुळे ते एकटे पडले होते. खऱ्या जगाशी त्यांचा संपर्क तुटला होता. तालिबानींच्या आक्रमणाला तोंड देणाऱ्या अफगाणी फौजांचे व्यवस्थापन करता आले नाही. अमेरिकेचे अनुदान वेळेवर येऊनही अफगाणी लष्कराला वेळेवर पगार मिळत नव्हता. दारूगोळा, रसद त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती. त्यांचे मनोबल खच्ची झाले होते.

मी पुन्हा अफगाणिस्तानमध्ये परतेन, असे आता अशरफ घनी म्हणताहेत; मात्र त्यावर आता कुणी विश्वास ठेवणार नाही. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले शेवटचे अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव इतिहासात कोरले जाईल. दोन दशकात सामाजिक, आर्थिक क्षेत्रात बऱ्यापैकी प्रगती केलेल्या अफगाणिस्तानला मध्यमयुगीन, धर्मांध तालिबानींच्या हाती लोटणारा अध्यक्ष अशीच ओळख इतिहास त्यांची ठेवणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.