Pakistan President : पाकिस्तानच्या अध्यक्षपदी असिफ अली झरदारी (वय ६८) यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे. नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय विधानसभांमध्ये शनिवारी अध्यक्षपदासाठी मतदान झाले.
पाकिस्तानच्या १४ व्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शनिवारी सकाळी दहा वाजता मतदानाला सुरूवात झाली. सायंकाळी चारपर्यंत ते सुरू होते. झरदारी हे पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) या पक्षांचे संयुक्त उमेदवार होते. सुन्नी इत्तेहाद कौन्सिलचे (एसआयसी) उमेदवार महमूद खान अचकझाई (वय ७५) हेही अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात होते.
झरदारी हे विद्यमान अध्यक्ष डॉ. अरिफ अल्वी यांची जागी घेणार आहेत. अल्वी यांची पाच वर्षांची मुदत गेल्या वर्षीच संपुष्टात आली होती. पण जोपर्यंत नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत ते पदावर राहणार आहेत. पाकिस्तानच्या घटनेनुसार अध्यक्षपदाची निवड अप्रत्यक्षपणे एका निवडणूक मंडळाकडून केली जाते. यात मध्यवर्ती आणि प्रांतिक सदस्य सहभागी असतात. मतदानासाठी नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय विधानसभांच्या इमारतींमध्ये मतदान झाले.
नॅशनल असेंब्लीच्या संयुक्त सत्रात झरदारी यांनी अध्यक्षपदासाठी मतदान केले. पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे झरदारी पती आहे तर ‘पीपीपी’चे नेते बिलावल भुट्टो झरदारी यांचे वडील आहेत. पंतप्रधान शहबाज शरीफ, ‘बिलावल भुट्टो झरदारी, ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’चे (पीटीआय) ओमर अयुब आणि ‘पीएमएल-एन’चे इशाक दार आदी बड्या नेत्यांनी मतदान केले. मतमोजणीपूर्वीच बिलावल भुट्टो यांनी वडिलांच्या विजयाबद्दल खात्री व्यक्त केली होती. ‘जो सरदार बनलेला झरदारी पुन्हा सरदार बनणार. दम मस्त कलंदर झरदारी,’ अशी पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर केली होती.
अचकझाई त्यांच्या पख्तुन्ख्वा मिल्ली अवामी पार्टीचे (पीकेएमएपी) प्रमुख आहेत. ‘सुन्नी इत्तेहाद कौन्सिल’कडून ते अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले होते. सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाचे समर्थक अपक्ष उमेदवार ‘पीकेएमएपी’मध्ये सहभागी झाल्यानंतर हा पक्ष प्रकाशझोतात आला. अध्यक्षपदाची निवडणूक निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात झाली नसल्याने निषेध करीत आम्ही या निवडणुकीत सहभागी झालो, असे ‘पीटीआय’चे नेते अली जफर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.