Israel-Hamas War : शस्त्रसंधीचा काळ वाढविण्याचे प्रयत्न; मध्यस्थ देशांकडून इस्राईल आणि हमासवर दबाव
तेल अविव : इस्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या चार दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदत आणखी काही दिवस वाढवावी, यासाठी या दोन्ही बाजूंवर दबाव आणला जात आहे. इस्राईल मात्र हमासला नेस्तनाबूत करण्यासाठी निश्चयी आहे. दरम्यान, आज शस्त्रसंधीच्या अखेरच्या दिवशी हमासने ११ इस्रायलींची सुटका करणे अपेक्षित असून, रात्री उशिरापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.
इस्राईल आणि हमास यांच्यात सात ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या रक्तरंजित युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूंकडील मिळून सुमारे सतरा हजार जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीतून हमासचे अस्तित्वच नष्ट करण्याचा चंग इस्राईलच्या लष्कराने बांधला असून दीड महिन्याच्या काळात त्यांनी या भागावर लढाऊ विमाने आणि रणगाड्यांद्वारे बाँबचा प्रचंड वर्षाव केला.
मात्र, हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेसाठी म्हणून त्यांनी चार दिवसांच्या शस्त्रसंधीस मान्यता दिली. अमेरिका, कतार आणि इजिप्त यांच्या मध्यस्थीने २४ नोव्हेंबरला सुरू झालेल्या युद्धबंदीचा आजचा अखेरचा दिवस होता.
करारानुसार, हमासने काही विदेशी नागरिकांसह इस्राईलच्या ५० नागरिकांना मुक्त केले असून इस्राईलनेही १५० पॅलेस्टिनींना सोडले आहे. हमासला आणखी युद्धबंदी हवी असल्यास दर दिवसामागे त्यांना १० ओलिसांना सोडावे लागेल, असे इस्राईलने आधीच स्पष्ट केले आहे.
तरीही, या अटीव्यतिरिक्तही शस्त्रसंधीचा कालावधी वाढविला जावा, यासाठी मध्यस्थ देश प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी दोन्ही बाजूंच्या नेत्यांबरोबर चर्चा सुरू आहे. या चर्चेला काहीसे यश आले असून युद्धबंदीचा कालावधी आणखी एक दिवस वाढविण्याची तयारी दोन्ही बाजूंनी दर्शविल्याचे समजते.
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी काल (ता. २६) गाझा पट्टीत जाऊन आपल्या सैनिकांचे मनोबल वाढविले. सध्या इस्राईलचा हल्ल्याचा भर उत्तर गाझामध्ये असून गरज पडल्यास दक्षिण गाझामध्येही हल्ले करू, असा इशारा इस्राईलच्या लष्कराने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.