Shaik Haseena : बांगलादेशची सूत्रे लष्कराकडे ; तीव्र आंदोलनानंतर शेख हसीना परागंदा,भवितव्य अनिश्‍चित

बांगलादेशात सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज अचानक अत्यंत तीव्र वळण लागले. हिंसक बनलेले विद्यार्थ्यांचे हे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले.
Shaik Haseena
Shaik Haseenasakal
Updated on

ढाका : बांगलादेशात सरकारविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज अचानक अत्यंत तीव्र वळण लागले. हिंसक बनलेले विद्यार्थ्यांचे हे आंदोलन नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले. आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानामध्ये घुसत तोडफोड केली. यानंतर लष्कराने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देशाची सूत्रे स्वत:कडे घेत असल्याचे जाहीर केले. लष्कर लवकरच हंगामी सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे येथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून भारताच्या या शेजारी देशामध्ये लष्करशाही येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना देशाबाहेर परागंदा झाल्या आहेत.

बांगलादेशमध्ये महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या आणि मागील दोन दिवसांपासून तीव्र झालेल्या या आंदोलनाच्या या वणव्यात सुमारे तीनशे जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी नोकरीतील अवाजवी आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी म्हणून विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला तीन आठवड्यांपूर्वी हिंसक वळण लागून किमान दोनशे जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत आरक्षण घटविले होते. मात्र, मागील तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन सुरू करत शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. सरकारविरोधात सुरू केलेल्या या असहकार आंदोलनावेळी पुन्हा हिंसाचार होऊन किमान १०६ जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी आंदोलकांनी ढाक्याच्या दिशेने ‘लाँग मार्च’ची हाक दिली होती. त्यासाठी ढाक्यामध्ये हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले होते. आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारने सैन्यालाही तैनात केले होते. तसेच, आज सकाळीच सरकारने देशातील इंटरनेट सेवा ठप्प केली होती. लाखोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरावर आणि कार्यालयावर हल्ले केले.

शेख हसीना या बांगलादेशात २००९ पासून सत्तेवर होत्या. मागील जानेवारीमध्ये त्या सलग चौथ्यांदा निवडून आल्या होत्या. या निवडणुकीवर माजी पंतप्रधान खालेदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीने बहिष्कार घातला होता.

घर लुटले, कार्यालय जाळले

सरकारला तीव्र विरोध असलेल्या शेकडो आंदोलकांनी हसीना यांच्या सरकारी निवासस्थानात घुसत तोडफोड केली. अनेकांनी लुटालूटही केली. आंदोलकांनी शेख हसीना यांचे कार्यालयही जाळून टाकले. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री असादुझ्झमान खान यांच्या घरात घुसतही तोडफोड केली. हा सर्व प्रकार घडत असतानाच शेख हसीना राजीनामा देऊन परागंदा झाल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे आंदोलकांनी जल्लोष केला. त्यांनी शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेश मुक्ती संग्रामाचे नेते शेख मुजिबूर रेहमान यांचा पुतळाही हातोड्याने फोडला. देशभरात इतर नेत्यांच्या घरांवरही हल्ले झाले.

हंगामी सरकारची घोषणा

शेख हसीना पळून गेल्यानंतर लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-झमान यांनी देशाची सूत्रे हंगामी सरकारकडे जात असल्याचे जाहीर केले. ‘हसीना यांनी राजीनामा दिला असून देशातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. नागरिकांनी सहकार्य करावे,’ असे जनरल झमान यांनी दूरचित्रवाणीवरून बोलत नागरिकांना आवाहन केले. आपण राजकीय नेत्यांना भेटलो आहोत आणि लष्कराच्या हातात सूत्रे घेत असल्याचे त्यांना सांगितले आहे, असेही झमान यांनी सांगितले. झमन यांनी शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या नेत्यांशी मात्र कोणताही संपर्क साधला नसल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.