पुणे - तुमच्या गाडीचा अमुक तमुक पार्ट गेलाय, म्हणून गाडी प्रॉब्लेम देतेय.. ! असं म्हणणारे मेकॅनिक आठवतायेत? ज्या प्रमाणे तुमच्या गाडीचा एखादा पार्ट खराब झाला किंवा खराब होण्याच्या मार्गावर असेल तर तुमची गाडी वारंवार त्रास देते किंवा बंदही पडते तसेच काहीसे तुमच्या शरीराचेही!
तुमच्या शरीरातील महत्वाची इंद्रिये खराब झाली की, तुमच्या शरीराची गाडी बिघडू शकते. पण मग कोणत्या इंद्रियांचं कार्य कसं चालतंय हे आधीच कळलं तर?? कदाचित पुढे येणारे धोके म्हणजेच आजार थांबविणे शक्य होईल.
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड मेडिसिन शास्त्रज्ञांच्या नेतृत्वात एक नवीन संशोधन नुकतेच 'नेचर ऑनलाईन' या जर्नल मध्ये प्रसिद्ध झाले आहे. ज्यामध्ये रक्ताच्या चाचणीच्या माध्यमातून तुमच्या शरीरातील अकरा इंद्रियांचे वय ठरविणे शक्य झाले आहे.
हृदय, स्थूलता , फुफ्फुस , रोगप्रतिकारकता, मूत्रपिंड (किडनी), यकृत (लिव्हर), स्वादुपिंड (पॅनक्रियाज), स्नायू, मेंदू, रक्तवाहिन्या आणि आतडे आदी शरीरातील अवयवांचा यामध्ये समावेश आहे.
शरीरातील विशिष्ट प्रथिनांचा अभ्यास करून या अवयव वृद्धत्वाचा अंदाज लावणे शक्य झाले आहे. यामुळे एखाद्या अवयवाशी संबंधित आजाराची पूर्वकल्पना आपल्याला मिळू शकते.
या संशोधनादरम्यान ५ हजार ६७८ प्रौढ व्यक्तींचे पाच गट करत अभ्यास करण्यात आले होते. या संशोधनातून असे समोर आले की, जैविक वय आणि काळानुसार झालेले वय (क्रोनिकल एज) यात एका अवयवाच्या वयात २० टक्क्यांपर्यंत फरक आढळून आला तर सर्व अवयवांच्या बाबतीत हे प्रमाण १.७ टक्के एवढे आहे.
जैविक वय व प्रत्यक्षात वयाच्या फरकामुळे २० ते ५० टक्के मरणाचा धोका असतो. तसेच एखाद्या विशिष्ट अवयवाशी संबंधित आजार हा त्या अवयवाच्या वृद्धत्वाशी निगडित असतो.
या संशोधनातून असेही समोर आले की, हृदयाचे जैविक वय आणि प्रत्यक्ष वय यात जर फरक असेल तर हृदयविकाराचा धोका हा २५० टक्क्याने वाढतो. आणि हा फरक जर मेंदू आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित असेल तर अल्झायमर सारख्या आजाराला निमंत्रण देणारा ठरू शकतो.
या अभ्यासाचे ज्येष्ठ लेखक, न्यूरोलॉजीचे प्राध्यापक टोनी वेस कोरी सांगितले की , जेव्हा आम्ही गंभीर आजार नसलेल्या व्यक्तींच्या प्रत्येक अवयवाच्या जैविक वय आणि क्रोनिकल वयाची तुलना केली तेव्हा आम्हाला आढळले की ५० किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या १८.४ टक्के लोकांमध्ये कमीतकमी एका अवयवाचे वृद्धत्व जडल्याचे प्रमाण अधिक होते.
या संशोधनामुळे भविष्यात अवयवांच्या वयामुळे होणारे आजार काही वैद्यकीय लक्षणे दिसण्याआधीच तपासणे शक्य होणार आहे. त्यामुळे एखादा रोग किंवा आजार होण्याआधीच अवयवांच्या बिघाडीवर काम करणे शक्य होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय शास्त्रात या संशोधनाला महत्व प्राप्त झाले आहे.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.