सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. त्यातही चिंता वाढवणारी बाब म्हणजे भारतात प्रतिदिन कोरोनाच्या ४ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचे निदान होत आहे. तज्ज्ञांच्या मते ज्यांची प्रतिकारक्षमता चांगली आहे ती लोकं या आजारातून लवकर सावरत आहेत. पण ज्यांची कमी प्रतिकारक्षमता आहे त्यांची परिस्थिती धोकादायक होत आहे. त्यामूळे चांगली रोग प्रतिकारक्षमता असणे किती महत्त्वाचे आहे ते आपल्याला समजते.
आपल्या शरीरातील चांगली रोग प्रतिकारक्षमता म्हणजे नक्की काय? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. रोग प्रतिकारक्षमता म्हणजे जेंव्हा एखादा जंतू, विषाणू किंवा जिवाणू आपल्या शरीरात शिरतो तेंव्हा आपल्या शरीरातील काही पेशी त्याला शोधून निकामी करतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर जाणवू देत नाहीत. आपल्या शरीरात टी- सेल आणि बी-सेल अशा प्रमुख दोन पेशी शरीराचे संरक्षण करत असतात.
ज्यांची प्रतिकारक्षमता कमकुवत असते त्यांना वारंवार आजाराला सामोरे जावे लागते. जर एखाद्या शरीरात रोग प्रतिकारकशक्ती निर्माण करणारी यंत्रणाच नसेल तर काय? असं असू शकतं का? असे अनेक प्रश्न बऱ्याचदा अनेकांच्या मनाला शिवून जात असतील. पण जगात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांच्यात शुन्य किंवा अत्यल्प रोग प्रतिकारक्षमता असते. त्यांचे जगणे ही एक प्रकारची मोठी कसोटी असते. कारण एखाद्याच्या स्पर्शानेही त्यांना बाधा होते आणि तब्येत बिघडत असते.
अशाच प्रकारचे आयुष्य अमेरिकेत जन्मलेल्या डेव्हिड फिलीप व्हेटरचे (david vetter) होते. डेव्हिडचा जन्म २१ सप्टेंबर १९७१ रोजी झाला होता. डेव्हिडची रोग प्रतिकारकक्षमता अगदी नगण्य होती. त्यामूळे त्याला वातावरणातून कसला संसर्ग होऊ नये म्हणून नेहमी एका बायो बबलमध्ये ठेवले जात होते. अशाप्रकारे कमी प्रतिकारक्षमता असणे हा जणुकीय बदलांमुळे होणारा प्रकार आहे. याला severe combined immunodeficiency (SCID) असंही म्हटलं जातं. यामध्ये एकदम साध्या संसर्गानेही मृत्यू होऊ शकतो. यामूळे डेव्हिडलाही असंच एका बायोबबलमध्ये जगावं लागलं होतं. विशेष म्हणजे त्याच्या आयुष्यातील मोजून दोनच आठवडे तो मोकळ्या वातावरणात जगला असेल. तेदेखील योग्य काळजी घेऊन.
डेव्हिडसारख्या केस या खूप दुर्मिळ असतात. ५८ हजार मुलांमध्ये एखादामध्ये SCID दिसून येतो. आई-वडिलांमधील काही गुणसुत्रे संक्रमित होऊन सक्रिय होतात तेंव्हा SCID ग्रस्त बाळ जन्माला येते. डेव्हिडला असं बायोबबलमध्ये ठेवणे गरजेचे आणि नैतिकतेच्या दृष्टीने विचार करायला लावणारे होते. २० शतकाच्या उत्तरार्ध डेव्हिड जगातील अनेक तज्ज्ञांच्या आणि डॉक्टरांच्या अभ्यासाचा विषय बनला होता, कारण त्यावेळेस आतासारखे मेडिकल क्षेत्र विकसित झाले नव्हते. त्यामूळे डेव्हिडचे आई-वडिल आणि डॉक्टर डेव्हिडला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.
या काळातच विकसित होत असणाऱ्या तंत्रज्ञानाने डेव्हिडचे बोनमॅरो ट्रान्सप्लांट ऑपरेशन करण्याचे ठरले. यासाठी त्याची बहिण कॅथरीनचा बोनमॅरो त्याच्याशी जूळेल असा अंदाज डॉक्टरांचा होता. पण दुर्देवाने दोघांचा रक्तगट जुळला नाही. पण नंतर तत्रज्ञानाने रक्तगट जुळण्याची आवश्यकता नसते हा नवीन शोध लागला होता. त्यामूळे अखेर बहिनीचा बोनमॅरो वापरायचा असं ठरलं.
या ऑपरेशनप्रसंगी डेव्हिड बबलमधून बाहेर येऊन एका निर्जंतुक केलेल्या रुममध्ये ऍडमीट झाला होता. डेव्हिडने वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदाच मानवी स्पर्श १२ अनुभवला होता. त्याप्रसंगी त्याची आईने डेव्हिडच्या गालावर एक गोड पापादेखील दिला होता. पण हा मानवी स्पर्श त्याच्या आयुष्यातील पहिला आणि अखेरचा ठरेल असं कोणालाचा वाटलं नव्हतं.
ऑपरेशनवेळी बहिन कॅथरीनचा बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आला पण कॅथरीनच्या बोनमॅरोमधूनच डेव्हिडला संसर्ग झाला आणि त्यातून डेव्हिडच्या शरीरात कॅन्सर पसरला. कॅथरीनच्या शरीरातून घेतलेल्या बोनमॅरोमध्ये जीवघेणा Epstein-Barr virus होता जो डॉक्टरांना ऑपरेशनप्रसंगी दिसला नाही. हा विषाणूने डेव्हिडच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर कॅन्सरच्या पेशींना उत्तेजन दिले आणि रोग प्रतिकारकक्षमता नसलेल्या डेव्हिडच्या शरीराला कॅन्सर सेलने काही दिवसातच पोखरून काढले आणि त्यातच डेव्हिडचा दुर्देवी मृत्यू झाला. वयाच्या बाराव्या वर्षी डेव्हिडला जीव सोडावा लागला होता.
त्यानंतर काही वर्षांनी बोनमॅरो ट्रान्सप्लांट वयाच्या ३ वर्षांपर्यंत केले तरच यशस्वी ठरतो हे देखील सिद्ध झाले. पण तेंव्हा डेव्हिड नव्हता. डेव्हिडला ज्यावेळीस स्मशानात दफन केले तेंव्हा थडग्यावर लिहले की, ' त्याने कधीच या जगाला स्पर्श केला नाही, पण त्याच्यामुळे संपूर्ण जग मात्र हेलावून गेले'.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.