बीजिंग - अर्थव्यवस्थेतील शैथिल्य, बेरोजगारीचा वाढता आलेख आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांमधून बऱ्याच नोकरदारांना मिळणारा ‘नारळ’ यामुळे चीनमधील युवापिढीचा लग्नसारखे महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलण्याकडे कल असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, लग्नाच्या दरात पूर्वीपासून होणारी येथील घसरण वाढीस लागली आहे.
याबाबतीत ग्रेस झँग या तरुणीचे उदाहरण पुरेसे बोलके आहे. लग्नाबाबत ती काहीशी द्विधा मनःस्थितीत असतानाच कोरोनाकाळातील लॉकडाउनमध्ये तिला शांघायमध्ये मागील वर्षी दोन महिने बंदिस्त वातावरणात राहावे लागले.
नंतरच्या काळात कार्यालयीन कामकाज पुन्हा सुरू केल्यानंतर आपली मानसिकता सकारात्मक होण्यास मदत होईल, असे तिला वाटत होते. परंतु, कंपनीतील कर्मचारी कपातीमुळे लग्नाबाबतीत ती पुन्हा द्विधा मनःस्थितीत गेली.
तिला प्रियकरदेखील आहे. मात्र, घरच्यांनी लग्न करून स्थिर होण्याचा लकडा लावला असला तरी, सध्या तिचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. सध्याच्या एकंदर वातावरणामुळे आधीच जीवनात अस्थिरता असताना, लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेण्याबाबत मनात साशंकता असल्याचे तिने सांगितले.
देशात सध्या शिक्षणातील जीवघेण्या झालेल्या स्पर्धेमुळेदेखील अनेक तरुण स्वतःला लग्नाच्या निर्णयापासून परावृत्त करत आहेत. भविष्यात आपल्याला मुले झाल्यास या स्पर्धेत त्यांना लोटणे आवडणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
तरुणींचा विचार केला असता, आर्थिक स्थैर्यात तसेच शिक्षणात वाढ झाल्याने लग्न ही त्यांच्याकरिता प्राधान्याची बाब राहिलेली नाही. तर, लग्नासंदर्भात पाहणी करता असतानाच घर, गाडी आदी गोष्टी असणे आवश्यक बनल्याने, त्याचे दडपण तरुणांवर येत असल्याने त्यांच्यासाठीही लग्न ही आता परवडणारी गोष्ट राहिलेली नाही.
गेल्या काही वर्षांत सातत्याने घसरण
येथील सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मागील नऊ वर्षांचा विचार केला असता यामध्ये सातत्याने घसरण झालेली पाहायला मिळते आहे. मागील वर्षी साधारण ६८ लाख नागरिकांनी लग्नासाठी नोंदणी केली होती. १९८६ पासूनचा विचार केल्यास ही सर्वांत नीचांकी आकडेवारी होती. २०१३ मध्ये सुमारे १ कोटी ३५ लाख लोकांनी नोंदणी केली होती.
यावर्षी लग्न करणाऱ्यांची संख्या वाढली
या सर्व पार्श्वभूमीवर काहीशी आशादायक बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी लग्नाची नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसते. तथापि, संसार अर्ध्यावरच तुटण्याच्या संख्येतही वाढ होताना दिसते आहे. २०२३ च्या पहिल्या तिमाहीत मागील वर्षापेक्षा ४० हजार लग्नांची अधिक नोंदणी झाली आहे. तर, याचकाळात एक लाख २७ हजार जणांचे घटस्फोटही झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.