जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा धोका कमी झाला असं दिसत असतानाच आता एक गंभीर बातमी समोर आली आहे. चीनमध्ये कोविड-१९ विषाणूची आणखी एक लाट येऊ शकते, असा दावा करण्यात येतो आहे. चीनमध्ये दर आठवड्याला कोरोनाचे सुमारे साडेसहा कोटी रुग्ण आढळू शकतात, असं यात म्हटलं आहे.
रिसर्च सेंटरचा दावा
चीनमधील नॅशनल क्लिनीकल रिसर्च सेंटर फॉर रेस्पिरेटरी डिसीजचे प्रमुख झोंग नानशान यांनी याबाबत माहिती दिली. एप्रिल महिन्यापासूनच देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ (China Covid cases increasing) होत असल्याचं दिसत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन XBB या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
साडेसहा कोटी रुग्ण
झोंग यांनी सांगितले, की चीनमध्ये मे महिन्याच्या अखेरीपर्यंत दर आठवड्याला सुमारे चार कोटी नव्या कोरोना रुग्णांची नोंद होईल. जूनपर्यंत हीच संख्या आठवड्याला साडेसहा कोटी रुग्णांपर्यंत जाईल, असा अंदाज मत झोंग यांनी व्यक्त केला. त्यामुळे चीनमध्ये आता कोरोनाची आणखी एक मोठी लाट (new covid wave in China) येऊ शकते.
चीनला सर्वाधिक फटका
कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका चीनलाच बसला आहे. गेल्या वर्षी संपूर्ण चीनला कोरोनाने बेजार केले होते. त्यावेळी चीनमध्ये दिवसाला सुमारे साडेतीन कोटी नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत होती. यानंतर काही काळ कोरोनाची लाट ओसरली. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा तांडव पहायला मिळू शकतो.
लसीची चाचणी सुरू
चीनमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, XBB हा ओमिक्रॉनच्या BA.2.75 आणि BJ.2 या सब-व्हेरियंटचे हायब्रिड रुप आहे. यामुळे चीनमध्ये नवीन कोरोना लसीची चाचणी सुरू आहे, जी XBB व्हेरियंटवर देखील प्रभावी असेल. या लसीच्या पहिल्या दोन चाचण्या यशस्वी झाल्या असून, आणखी दोन चाचण्यांनंतर या लसीला मंजूरी मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.