होनोलुलु ही हवाई बेटांची राजधानी. ती ओआहू बेटावर आहे. तिला पार्श्वभूमी आहे सुमारे चार ते पाच लाख वर्षे दिमाखाने उभ्या असलेल्या डायमंड हेड या सूप्त ज्वालामुखीची. त्याची उंची 762 फूट. डायमंड हेड नं होनोलुलुच्या अमर्याद सौंदर्यात भर टाकलीय. होनोलुलुत त्यापेक्षा जुनी पर्वतराजी आहे, ती कुआलोआ रेंज. या पर्वतराजीची. तिचं वय आहे वीस लाख साठ हजार वर्षे.
पुण्यानजिक सैह्याद्रीतील सिंहगड, रायगड, पुरंदर, तोरणा आदी डोंगरांवर जाण्यासाठी जशी गर्दी असते, तशी गर्दी डायमंड हेडच्या दिशेने रोज पाहावयास मिळते. वायकीकी हा जगप्रसिद्ध समुद्रकिनारा (बीच). पुढे त्याचाच विस्तार अला मुआना बीच व कॅपिओलोनी उद्यानाच्या दिशेनं होतो. भारतात दक्षिणेकडील धनुष्यकोडी वा गोव्यातील मिरामार बीच नजिकचे समुद्र जितके उथळ व शांत आहेत, तसा हा किनारा असल्याने रोज हजारो पर्यटक त्यात डुंबताना दिसतात. त्यात लहान मुलांपासून ते थेट वृद्धांनी गर्दी केलेली असते.
काही स्नॉर्केलिंग करणारे, काही कॅनो अन् वल्हे मारीत चाललेले, काही छोट्या मोठ्या फ्लोटिंग बोर्डवर तरंगणारे, काही आणखी दूर जाऊन उसळणाऱ्या लाटांवर सर्फींग करणारे, काही पॅरा सेलिंग करणारे, काही मोठ्या बोटीतून पॅसिफिकची छोटी सफर करणारे, काही काठाकाठावर अँकर लावून गळाला मासा लागतोय का याची प्रतीक्षा करणारे, काही रंगीबेरंगी ट्यूब्ज्च्या आत बसून तरंगणारे, असे विहंमग दृश्य दिसते.