Israel Attacks Lebanon : हिज्बुल्लाला आणखी एक दणका; इस्राईलच्या माऱ्यात केंद्रीय समितीचा उपप्रमुख ठार

लेबनॉनमधील हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेला एकामागून एक हादरे देणाऱ्या इस्राईलने आज त्यांना आणखी एक दणका दिला.
deputy head of Central Committee was killed in an attack by Israel Hezbollah
deputy head of Central Committee was killed in an attack by Israel Hezbollahsakal
Updated on

जेरूसलेम : लेबनॉनमधील हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेला एकामागून एक हादरे देणाऱ्या इस्राईलने आज त्यांना आणखी एक दणका दिला. बैरूत जवळील मुख्यालयावर हल्ला करत हिज्बुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला याला ठार मारल्यानंतर इस्राईलच्या लष्कराने आज आणखी एका हवाई हल्ल्यात या संघटनेच्या केंद्रीय समितीचा उपप्रमुख नबिल काऊक याचा खातमा केला.

इस्राईलच्या संरक्षण मंत्रालयाने आज सोशल मीडियावर नबिल काऊक याला ठार मारल्याचे जाहीर केले. इस्राईल आणि या देशाच्या नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांच्या अनेक कटांत त्याचा सहभाग होता. १९८० च्या दशकात तो हिज्बुल्ला संघटनेत सामील झाला होता.

तेव्हापासून त्याने संघटनेत विविध आघाड्यांवर काम करत दहशतवादी कारवाया केल्या असल्याचे इस्राईलचे म्हणणे आहे. हिज्बुल्लाच्या म्होरक्यांना ठार मारण्याची आपली मोहीम पुढे सुरूच ठेवू, असे इस्राईलने जाहीर केले आहे.

गाझा पट्टीतील हमासला खिळखिळे करणाऱ्या इस्राईलने मागील काही दिवसांपासून हिज्बुल्लाला लक्ष्य केले आहे. आधी त्यांनी हिज्बुल्लाच्या शेकडो दहशतवाद्यांकडील पेजरमध्ये स्फोट घडवून आणला, त्यानंतर वॉकीटॉकी आणि इतर उपकरणांमध्येही स्फोट घडवून आणले.

या स्फोटांमुळे हिज्बुल्ला आश्‍चर्यचकीत झाली असतानाच इस्राईलने त्यांना जराशीही संधी न देता लेबनॉनमधील त्यांच्या सुमारे सोळाशे ठिकाणांवर तुफान बाँबवर्षाव केला. यामध्ये साडे पाचशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला. नंतर इस्राईलने बैरूतच्या दक्षिण भागातील हिज्बुल्लाच्या मुख्यालयावरच लक्ष्यवेधी मारा करत सहा इमारतींना धुळीला मिळवले. यातच नसरल्ला मारला गेला.

संघर्ष सुरूच ठेवणार : हिज्बुल्ला

इस्राईलच्या हल्ल्यात प्रमुख म्होरक्या हसन नसरल्ला मारला गेल्याचे हिज्बुल्लाने आज मान्य केले. तसेच, शत्रूविरोधातील संघर्ष आणि पॅलेस्टाइनला समर्थन कायम ठेवणार असल्याचेही या संघटनेने जाहीर केले. नसरल्ला हा तीन दशकांपासून इस्राईलच्या ‘हिट लिस्ट’वर होता. त्याच्या मृत्युबद्दल हमासनेही दु:ख व्यक्त केले आहे. नसरल्लाच्या मृत्युमुळे इस्राईलशी संघर्ष कमी नाही, तर वाढणार आहे, असा इशाराही हमासने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.