वॉशिंग्टन - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वांत उंच पुतळा उत्तर अमेरिकेत उभारण्यात आला असून येत्या १४ तारखेला पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या १९ फूट उंचीच्या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असे नाव देण्यात आले आहे.
उत्तर अमेरिकेतील मेरीलॅंड या राज्यातील अकोकीक शहरात १३ एकरवर डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (एआयसी) उभारण्यात येत आहे. या केंद्रामध्येच बाबासाहेबांचा हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. अकोकीक हे शहर वॉशिंग्टनपासून ३५ कि.मी.वर आहे.
या केंद्रामध्ये डॉ. आंबेडकर स्मारक साकारण्यात येत असून या स्मारकामध्येच हा पुतळा उभारला आहे, अशी माहिती एआयसीकडून देण्यात आली. हे स्मारक डॉ. आंबेडकरांचा संदेश जगभरात पसरवून समानता व मानवाधिकारांचे उत्तम उदाहरण बनेल, असा विश्वासही एआयसीने व्यक्त केला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. ते आपल्या अनुयायांमध्ये बाबासाहेब म्हणून लोकप्रिय होते. संविधान सभेच्या सर्वांत महत्त्वपूर्ण मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. या अध्यक्षपदानेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशी ओळख मिळवून दिली.
त्याचप्रमाणे, स्वातंत्र्यानंतरही त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकर कायदामंत्री होते. दलित व अस्पृश्यांच्या अधिकारांसाठीच्या सामाजिक चळवळीत त्यांनी अमूल्य योगदान दिले. डॉ. आंबेडकरांचे महानिर्वाण ६ डिसेंबर १९५६ रोजी झाले.
त्याचवर्षी १४ ऑक्टोबर रोजी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. हा दिवस त्यांच्या अनुयायांकडून धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी याच दिवशी मेरीलॅंडमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
राम सुतार यांच्याकडून निर्मिती
प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा बनविला आहे. त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळाही तयार केला असून गुजरातेत नर्मदा नदीवरील बेटावर तो उभारण्यात आला आहे. पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला अमेरिकेसह जगभरातील डॉ. आंबेडकरांचे अनुयायी तसेच विविध देशांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.