सुएझ कालव्यात अडकलेलं अवाढव्य मालवाहतूक जहाजं बाहेर काढण्यात यश आलंय. जहाज पुन्हा मार्गस्थ झाल्याने जगाने सुटकेचा निश्वास सोडलाय. जगातील 12 टक्के व्यापार हा या या कालव्याच्या माध्यमातून होतो. त्यामुळे सुएझ कालव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच कालव्यामुळे इतिहासात दोनदा युद्ध झालेत. शिवाय ब्रिटेन आणि फ्रान्ससारख्या साम्राज्यवादी देशांचा खरा चेहरा या कालव्यामुळे समोर आला. तर सुएझ कालव्याचा इतिहास काय आहे? तसेच जागतिक व्यापारात याचं महत्व काय आहे हे आपण बघुया. पनामा आणि सुएझ कालवे जगातील कृत्रिमरीत्या बांधलेले सर्वात मोठे कालवे आहेत. सुएझ कालव्यामुळे आतापर्यंत दोन युद्ध झालेत. दोन्ही युद्धे दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर लढण्यात आली. युरोप आणि आशियातील व्यापार जुना आहे. दोन्ही खंडातील व्यापार प्रामुख्याने समुद्राच्या मार्गानेच होत आलाय. याआधी युरोपीय देशांना चीन आणि भारतासारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी आफ्रिकेला वळसा घालून यावं लागायचं, हा मार्ग खूप दूरचा आणि खर्चिक होता. दक्षिण आफ्रिकेतील केप ऑप गूड होपला वळसा घालून येण्यास जहाजांना अनेक महिन्यांचा कालावधी लागायचा. त्यामुळे व्यापाऱ्यांना अशा मार्गाचा शोध होता जो कमी वेळात आशियापर्यंत पोहोचवेल.
नेपोलियन बोनापार्टची योजना
फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्टने तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र जोडण्याचा विचार मांडला होता. त्याला माहिती होतं की असं केल्याने फ्रान्सचा आशियावरील प्रभाव वाढू शकतो, त्यानंतर लगेच कालवा बनवण्याची योजना तयार करण्यात आली, पण दोन्ही सागरातील पाण्याचा स्तर वेगवेगळा असल्याचा गैरसमज झाला. त्यामुळे कालव्यामध्ये लॉक चेंबर्स बनवण्याची गरज त्यांना वाटू लागली. योजना बनून तयार होण्यास लागणारा कालावधी लक्षात घेता ही योजना नेपोलियनला सोडून द्यावी लागली. पण, पुढे 50 वर्षांनी हा गैरसमज दूर झाला आणि फ्रान्सनेच येथे कालवा बनवण्यास सुरुवात केली.
ब्रिटनचा कालव्याला विरोध
फ्रान्स आणि इजिप्तची चांगली मैत्री होती. इजिप्तलाही याठिकाणी कालवा बनवण्याचं महत्व पटलं होतं. त्यामुळे फ्रान्ससोबत 99 वर्षांचा करार करत इजिप्तने कालव्याची निर्मित करण्यास सुरुवात केली. पण. ब्रिटेनने या कालव्याला जोरदार विरोध सुरु केला. त्यावेळी आफ्रिकेला वळसा घालून जाणाऱ्या मार्गावर ब्रिटनचा ताबा होता. त्यामुळे ब्रिटनला भीती होती की यामुळे त्याचं महत्व आणि मक्तेदारी कमी झाली असती. तसेच भारतावरील त्याची पकड सैल झाली असते. त्यामुळे ब्रिटनने या कालव्याच्या विरोधात प्रचार करण्यास सुरुवात केली. अनेक अफवा पसरवल्या. तरी फ्रान्सने इजिप्तच्या मदतीने कालव्याचे काम सुरु केले.
1869 मध्ये कालवा बनला
कालवा बनवण्यासाठी 1859 मध्ये सुरुवात करण्यात आली. 10 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर 1869 मध्ये हा कालवा बनून तयार झाला. या कालव्याच्या निर्मितीमुळे समुद्री प्रवासामध्ये क्रांतीकारी बदल झाला. यापूर्वी लागणारा महिन्यांचा कालावधी आठवड्यांवर आला होता. असे असले तरी सुरुवातीच्या काळात या कालव्यातून खूप कमी जहाजे जात होती. याच काळात इजिप्तच्या प्रशासकावर कालव्याच्या निर्मितीमुळे आर्थिक संकट कोसळलं. याचा लाभ घेत ब्रिटनने इजिप्तकडून कालव्याचे 40 टक्के शेअर खरेदी केले, त्यामुळे कालव्यावर आता ब्रिटेन आणि फ्रान्सची मालकी प्रस्थापित झाली. ब्रिटनने या भागावरील आपले नियंत्रण वाढवले होते. त्यामुळे प्रदेशात विदेशी शक्तींचा प्रभाव वाढल्याचं लक्षात येताच इजिप्तच्या लोकांनी विद्रोह सुरु केला. पण, ब्रिटनने फ्रान्सच्या मदतीने इजिप्तचा हा विरोध मोडून काढला आणि इजिप्तच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला.
इस्त्रायलचा इजिप्तवर हल्ला
1936 मध्ये इजिप्तच्या स्वातंत्र्यानंतरही ब्रिटनने इजिप्तवरील नियंत्रण कमी केले नाही. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी आणि इटलीने कालव्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ब्रिटनने अमेरिकेच्या मदतीने हा प्रयत्न हाणून पाडला. याच काळात 99 वर्षांचा फ्रान्ससोबतचा करार संपल्याने इजिप्तने कालवा परत देण्याची मागणी केली. मोठ्या नाखूषीने फ्रान्स आणि ब्रिटनने कालव्यावरील ताबा सोडला. 1959 मध्ये इजिप्तने कालव्याचे राष्ट्रीकरण केलं आणि इस्त्राईलच्या जहाजांना येथून जाण्यापासून रोखलं. याच रागातून इस्त्राईलने इजिप्तच्या सिनाई प्रदेशावर हल्ला चढवला. दोन्ही देशात घमासान युद्ध सुरु झालं.
संयुक्त राष्ट्राचा हस्तक्षेप
या संधीचा लाभ घेत फ्रान्स आणि ब्रिटनने आपले सैन्य या भागात उतरवलं. या दोन्ही देशांचा हेतू पुन्हा कालव्यावर ताबा मिळवण्याचा होता. पण, संयुक्त राष्ट्राच्या मदतीने हा वाद तात्पुरत्या काळासाठी टळला. पण, पुन्हा इस्त्रायलने 1967 मध्ये सिनाई प्रांतावर हल्ला केला. तसेच दोन जहाजं बुडवत सुएझ कालवा ब्लॉक केला आणि ठिकठिकाणी सुरुंग बॉम्ब पेरले . त्यामुळे पुढील पाच वर्षे हा मार्ग पूर्णपणे बंद होता, 1973 मध्ये इजिप्तने इस्त्रायलच्या सैन्याला मागे हटवण्यासाठी हल्ला चढवला, पण इस्त्रायलने जोरदार प्रत्युत्तर देत इजिप्तच्या सैन्याला पुन्हा मागे हटवलं. यावेळी पुन्हा संयुक्त राष्ट्रांना हस्तक्षेप करावा लागला. संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही देशांनी जैसे-थे स्थितीवर येण्याचं मान्य केलं.
इजिप्तला दर तासाला मिळतात 2.800 कोटी
युद्ध संपलं पण कालवा पुन्हा सुरु होण्यास 2 वर्षे लागली. कारण तेथील सुरुंग बॉब्संना निष्क्रिय करण्यास खूप वेळ लागला. सध्या हा कालवा इजिप्तच्या ताब्यात आहे. जगातील कोणताही देश टॅक्स देऊन या कालव्यातून जाऊ शकतो. इजिप्त या टॅक्सच्या माध्यमातून दर तासाला तब्बल 2 हजार 800 कोटी रुपये कमावतो. एवर गिवेन जहाज या कालव्यात अडकल्यामुळे अख्या जगानं धसका घेतला होता. पण, हे जहाज बाहेर काढण्यात आल्यानं जगानं सुटकेचा निश्वास सोडलाय असंच म्हणावं लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.