वॉशिंग्टन - पर्यावरण बदल, शहरीकरण आणि इतर घडामोडींचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाल्याचे अनेक भौगोलिक आणि वातावरण बदलांच्या रुपाने आपल्याला दिसून येते. कमी झालेले वनक्षेत्र, आटलेली सरोवरे अशी अनेक उदाहरण आहेत. हा सर्व बदल कसा होत गेला, हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी ‘गुगल’ने उपलब्ध करून दिली आहे. ‘गुगल अर्थ’मध्ये ‘टाइमलॅप्स’ या नव्या फिचरचा समावेश केला असल्याची घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केली आहे. गुगलने २०१७ नंतर केलेला हे सर्वांत महत्त्वाचे अपडेट मानले जात आहे.
गुगलच्या ‘टाइमलॅप्स’ या नव्या फिचरच्या साह्याने गेल्या चार दशकांमध्ये पृथ्वीवरील वातावरणात झालेले बदल पाहता येणार आहेत. यासाठी गुगलने गेल्या ३७ वर्षांमधील २ कोटी ४० लाख उपग्रह छायाचित्रे एकत्र करत ४ डी तंत्रज्ञानाच्या साह्याने मांडली आहेत. याबाबत माहिती सांगताना पिचाई म्हणाले की, मानवी इतिहासात कधी झाले नव्हते इतक्या अधिक वेगाने गेल्या अर्ध शतकामध्ये पृथ्वीच्या वातावरणात मोठे बदल झाले आहेत. आपल्या वेगाने बदलणाऱ्या पृथ्वीचे चित्रण आम्ही लोकांसह मांडत आहोत. यामुळे पृथ्वीला तुम्ही एका नव्या दृष्टीकोनातून पाहू शकता.
टाइमलॅप्स ही गुगलची फार मोठी झेप आहे. कारण एखाद्या ठिकाणचे काढलेले साधे छायाचित्रही पृथ्वीवर झालेले बदल दाखविण्यासाठीचे महत्त्वाचे साधन बनू शकते. अमेरिका सरकार आणि युरोपीय महासंघाने यांनी त्यांच्याकडील माहिती खुली केल्याने, तसेच नासा आणि युरोपीय अवकाश संस्थेने छायाचित्रे पुरविल्याने हे शक्य झाले. ‘इस्रो’चेही सहकार्य घेण्याचा आमचा विचार आहे.
- रेबेका मूर, संचालक, गुगल अर्थ
असे आहे ‘टाइमलॅप्स’ फिचर
गुगल अर्थ ओपन करून तुम्ही एखादा भूभाग पाहत असतानाच ‘टाइमलॅप्स’ फिचरद्वारे तुम्ही त्या भूभागावरील वातावरणात गेल्या चार दशकांमध्ये झालेले बदल पाहू शकतात. ॲनिमेशन तंत्रज्ञानाद्वारे ते तुम्हाला दिसतात. याद्वारे विविध भूभागाचा अभ्यासही करता येणार असून यासाठी ‘नासा’ आणि इतर विज्ञान संस्था गुगलबरोबर भागीदारी करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.