पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार झाला आहे.
Imran Khan Latest Update : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर गुरुवारी संध्याकाळी हल्ला झाला. ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी इम्रान खान वजिराबादमध्ये लाँग मार्च काढत होते. इम्रान यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय.
गुरुवारी लाँग मार्चदरम्यान झालेल्या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायाला जबर मार लागला आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाल्याची माहिती आहे. पीटीआयच्या नेत्या डॉ. यास्मिन रशीद (Dr. Yasmin Rasheed) यांनी सांगितलं की, इम्रान खान यांच्या पायाला दोन गोळ्या लागल्या आहेत. ऑपरेशननंतर इम्रान खान धोक्याबाहेर असल्याची माहिती नंतर पाकिस्तानी माध्यमांनी दिली.
इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयनं आरोप केलाय की, विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ (PM Shahbaz Sharif), गृहमंत्री आणि लष्कराच्या एका जनरलनं त्यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न केला. इम्रानचा जवळचा सहकारी असद उमर यांनी एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी करून हा आरोप केलाय. गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी पीटीआयचे हे आरोप फेटाळून लावत सरकार तपासात सर्व प्रकारचं सहकार्य करण्यास तयार असल्याचं सांगितलं.
इम्रान खान यांच्यावर हा हल्ला पंजाबमधील वजिराबाद शहरातील अल्लावाला चौकात झाला. पंजाब पोलिसांनी एका निवेदनात म्हटलंय की, या घटनेत सात जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे.
जिओ टीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचं नाव नावेद असं आहे. 20 वर्षीय हल्लेखोरानं सलवार-कमीज घातलेला होता आणि तो इम्रान खानच्या कारसोबत प्रवास करत होता आणि डाव्या बाजूनं गोळीबार केल्याचं चॅनलनं म्हटलंय. पोलिसांनी पकडलेल्या संशयितानं सांगितलं की, त्याला इम्रान खानला मारायचं होतं. कारण, "तो जनतेची दिशाभूल करत आहे".
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केलाय. या घटनेबाबत तातडीनं अहवाल देण्याचे निर्देश त्यांनी गृहमंत्र्यांना दिलेत. शाहबाज शरीफ यांनी ट्विट केलंय की, "पीटीआय अध्यक्ष आणि इतर जखमी लोकांच्या प्रकृतीसाठी मी प्रार्थना करतो. सुरक्षा आणि तपासासाठी फेडरल सरकार पंजाब सरकारला सर्वतोपरी मदत करेल. आपल्या देशाच्या राजकारणात हिंसेला जागा नाही."
पाकिस्तानी मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पोलिसांनी घटनास्थळी तपासादरम्यान 11 गोळ्या जप्त केल्या आहेत. यापैकी 9 पिस्तुलच्या गोळ्या आहेत, तर 2 गोळ्या कोणत्यातरी मोठ्या शस्त्राच्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.