पॅरिस : फ्रान्समध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने कोणत्याही एका पक्षाच्या हाती सत्ता दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उजव्या विचारसरणीच्या नॅशनल रॅली पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची आशा असताना त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असल्याने युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या फ्रान्समध्ये राजकीय अनिश्चिततेचे वारे वाहू लागले आहे.
युरोपीय संसदेच्या निवडणुकीत पराभव झालेल्या रेनेसान्स पक्षाचे नेते आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जनतेचा कौल जाणून संभ्रम दूर करण्यासाठी मुदतपूर्व निवडणूक जाहीर केली होती. फ्रान्समध्येही ब्रिटनप्रमाणेच सत्तांतर होऊन उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरीन ली पेन यांच्या नॅशनल रॅली पक्षाला बहुमत मिळण्याची आणि पंतप्रधानपद त्यांच्याच नेत्याला मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती.
प्रत्यक्षात मात्र दोन टप्प्यांमध्ये झालेल्या या मतदानात मतदारांनी डाव्या आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून मॅक्रॉन यांच्या पक्षाला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळाल्या आहेत. नॅशनल रॅली तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २८९ जागांच्या आसपासही जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे मॅक्रॉन यांना आघाडीचे सरकार चालवावे लागणार आहे.
डाव्या आघाडीकडे नेतृत्व शक्य
विद्यमान पंतप्रधान गॅब्रिएल ॲटल यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, देशाला गरज असल्यास ऑलिंपिक स्पर्धा संपेपर्यंत जबाबदारी सांभाळू, असेही ते म्हणाले आहेत. फ्रान्समध्ये सरकार स्थापन करण्यासाठी विजयी उमेदवार आणि त्यांच्या पक्षाचे नेते लवकरच एकत्र येऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. सर्वाधिक जागा मिळालेल्या डाव्या आघाडीचे नेते जीन ल्युक मेलेनकॉन यांच्याकडे पंतप्रधानपद जाण्याची शक्यता आहे. मॅक्रॉन यांची अध्यक्षपदावर तीन वर्षे शिल्लक आहेत. डाव्या आघाडीचा मॅक्रॉन यांच्या अनेक धोरणांना स्पष्ट विरोध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.