बारी (इटली) - युरोपला भेडसावणाऱ्या स्थलांतराच्या मुद्द्यावर विकसित देशांच्या ‘जी-७’ परिषदेमध्ये आज दुसऱ्या दिवशी सखोल चर्चा झाली. पश्चिम आशिया, इराक-सीरिया, आफ्रिका या प्रदेशांमधील अस्थैर्यामुळे दररोज हजारो लोक बेकायदा मार्गाने युरोपमध्ये येऊन धडकत असतात. त्यामुळे हा मुद्दा परिषदेच्या अजेंड्यावर होता.
इटलीमधील प्युग्लिया प्रदेशातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये ही परिषद सुरू आहे. स्थलांतराच्या प्रश्नाबरोबरच सर्वाधिक स्थलांतरित असलेल्या देशांना आर्थिक मदत करणे आणि मानवी तस्करी रोखणे या मुद्द्यांवरही परिषदेमध्ये चर्चा झाली.
याशिवाय, युक्रेन-रशिया युद्ध, गाझा पट्टीतील युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यावरण बदल, चीनचे औद्योगिक धोरण आणि आर्थिक सुरक्षा अशा विविध मुद्द्यांवरही परिषदेत चर्चा झाली. परिषदेचे यजमानपद इटलीकडे असून अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जपान, कॅनडा आणि जर्मनी या सदस्य देशांचे प्रमुख आणि भारतासह इतर काही निमंत्रित देशांचे प्रमुखही येथे दाखल झाले आहेत.
युरोपीय संसदेच्या निवडणुकीतही स्थलांतराचा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. स्थलांतरितांना विरोध करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांना निवडणुकीत चांगले यश मिळाले होते. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे जी-७ परिषदेतही त्या स्थलांतराविरोधात ठोस धोरण राबविण्याचा आग्रह करत आहेत.
आफ्रिकेमधून होणारे स्थलांतर कमी करण्यासाठी तेथील देशांमध्ये गुंतवणूक करण्याचा आणि अधिक निधी पुरविण्याचा पर्याय मेलोनी यांनी सुचविला आहे. आफ्रिकेचा विकास हा युरोपच्या भल्यासाठी आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. स्थलांतर करू इच्छिणाऱ्यांचा अनेक टोळ्या फायदा घेत असल्याने त्यामुळे मानवी तस्करीचे प्रमाणही वाढले असल्याचे इटलीचे म्हणणे आहे.
‘एआय’साठी नियम हवेत
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या क्षेत्राचा अत्यंत वेगाने विकास होत असून प्रत्येक क्षेत्रात त्याचा वापर वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी जागतिक पातळीवर अत्यंत काटेकोर नियमावली असावी, अशी मागणी होत असून याबाबत ‘जी-७’ गटातील देशांनी चर्चा केली. पर्यावरण बदल रोखण्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्याबाबतही चर्चा झाली.
पोप फ्रान्सिस यांचे आवाहन
जी-७ परिषदेमध्ये प्रथमच ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी सदस्य देशांशी संवाद साधला. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्याचे आवाहन त्यांनी आपल्या संबोधनाद्वारे केले.
मोदी-मॅक्रॉन यांच्यात चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी इटलीमध्ये दाखल झाले. पंतप्रधानपद तिसऱ्यांदा स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची स्वतंत्रपणे भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
मॅक्रॉन यांच्याबरोबरील भेटीत संरक्षण, अणुऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यावरण बदल, डिजिटल सार्वजनिक सुविधा, मूलभूत तंत्रज्ञान, दळणवळण आणि सांस्कृतिक संबंध या क्षेत्रांमधील संबंध दृढ करण्याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी नंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.