नवी दिल्ली - पुढील महिन्यात पाकिस्तानात होणारी सार्वत्रिक निवडणूक हा एक बनाव ठरू शकतो, असा दावा पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी केला आहे. भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरलेल्या आणि सध्या तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांना निवडणुकीत सहभागी होण्यात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच त्यांनी हा आरोप केल्याचे मानले जात आहे.
इम्रान खान यांनी एका वृत्तपत्रासाठी लेख लिहीत विरोधकांवर टीका केली आहे. पाकिस्तानमध्ये आठ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी इम्रान यांनी भरलेला उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. या निर्णयाविरोधात इम्रान यांनी न्यायालयात याचिका केली असतानाच आज त्यांच्या पक्षाचे ‘बॅट’ हे निवडणूक चिन्हही नाकारण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर इम्रान यांनी आपले मत व्यक्त करताना, ही निवडणूक म्हणजे एक बनाव ठरेल, असे भाष्य केले आहे. ‘पाकिस्तानमध्ये सध्या केंद्रात आणि राज्यांमध्येही काळजीवाहू सरकारे आहेत. ही सर्व सरकारे बेकायदा आहेत, कारण विधानसभा विसर्जित झाल्यानंतर ९० दिवसांच्या आत येथे निवडणूक झालेली नाही.
चार पैकी दोन राज्यांमध्ये निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच वर्षी दिले असतानाही तिथे निवडणूक झालेली नाही. त्यामुळे आता सार्वत्रिक निवडणूकही होईल की नाही, याबाबत शंका आहे. इतर राजकीय पक्षांवर होत असलेल्या कारवाया पाहता, ही निवडणूक झाली तरी तो एक बनाव असेल,’ असे इम्रान यांनी म्हटले आहे.
इम्रान खान यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली आहे. आमच्या पक्षावर हेतुपुरस्सर कारवाई केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ‘आयोगाच्या निर्णयामुळे आमच्या पक्षांतर्गत निवडणुकीत अडथळे आले, त्यानंतर माझा अर्ज नाकारला गेला,’ असा आरोप इम्रान यांनी केला आहे.
‘बॅट’ चिन्हावर लढता येणार नाही
पेशावर: माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष ‘पीटीआय’ला उच्च न्यायालयाने आज झटका दिला आहे. पक्षाचे अनेक वर्षांपासूनचे ‘बॅट’ हे निवडणूक चिन्ह गोठविले आहे. या निर्णयाला अाव्हान देण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.
पक्षांतर्गत निवडणुका आयोगाने अमान्य करत ‘पीटीआय’चे चिन्ह गोठवले आहे. पेशावरच्या उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा २२ डिसेंबरचा हा आदेश कायम ठेवला. त्यामुळे इम्रान यांच्या उमेदवारांना या चिन्हाशिवाय निवडणूक लढवावी लागेल.
बिलावल भुट्टो पंतप्रधानपदाचे उमेदवार
लाहोर - पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) ने पक्षाचे अध्यक्ष आणि माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. ‘पीपीपी’च्या केंद्रीय कार्यकारी समितीने (सीईसी) बैठकीत निवडणूक प्रचाराचा आणि संभाव्य मोहिमेचा आढावा घेतला. जाहीरनाम्यावरही चर्चा करण्यात आली. तरुण, महिला सक्षमीकरण, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण या मुद्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगण्यात आले.
पक्षाने ‘एक्स’वर पोस्ट करताना म्हटले, आसिफ अली झरदारी यांनी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यास सीईसीने पाठिंबा दिला. यावर बिलावल यांनी आभार मानले. येत्या आठ फेब्रुवारीला द्वेष आणि फूट पाडण्याचे राजकारण संपवायचे आहे. देशाला सेवाभाव करणाऱ्या नव्या राजकारणाची गरज आहे, असे बिलावल म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.