United States : अमेरिकेत मंदीच्या शक्यतेने बाजारात ‘भूस्खलन’ ; जागतिक बाजारपेठांमध्ये पडझड,एकूण बाजारमूल्य १५.५ लाख कोटींनी घसरले

अमेरिकेतील संभाव्य मंदीची भीती, बँक ऑफ जपानने व्याजदर वाढवल्याचा परिणाम आणि पश्‍चिम आशियातील तणाव यामुळे सोमवार (ता. ५) हा जागतिक शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला.
United States
United Statessakal
Updated on

मुंबई : अमेरिकेतील संभाव्य मंदीची भीती, बँक ऑफ जपानने व्याजदर वाढवल्याचा परिणाम आणि पश्‍चिम आशियातील तणाव यामुळे सोमवार (ता. ५) हा जागतिक शेअर बाजारासाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाला असून सेन्सेक्स आणि निफ्टीदेखील पावणेतीन टक्क्यांच्या आसपास घसरले. सेन्सेक्समध्ये सोमवारी २२२२.५५ अंश, तर निफ्टीत ६६२.१० अंशांची घसरण नोंदविण्यात आली. दिवसअखेर सेन्सेक्स ७८,७५९.४० अंशांवर, तर निफ्टी २४,०५५ अंशांवर बंद झाला. शेअर बाजारातील या पडझडीमुळे दिवसभरात एकूण बाजारमूल्य तब्बल १५.५ लाख कोटींनी घसरले.

अमेरिकेतील नोकरभरतीची परिस्थिती नकारात्मक असल्याची आकडेवारी समोर आल्याने तेथे मंदीची भीती परत वाढली आहे. पश्‍चिम आशियात इराण आणि इस्राईलमध्ये युद्धाचे सावट गडद झाल्यामुळे सोमवारी जगभरातील शेअर बाजारात पडझड झाली. जपानचा निक्की निर्देशांक सुमारे १४ टक्के, तैवान व कोरियाचे निर्देशांक नऊ टक्के घसरले. कोरियाच्या शेअर बाजाराला डाउन सर्किट लागल्यामुळे तेथील व्यवहार काही काळ बंद झाले होते. जागतिक शेअर बाजारांतील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही झाला. बँक ऑफ जपानने व्याजदर वाढविल्यामुळे त्याचा परिणाम जपानी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या येथील गुंतवणुकीवर होण्याची भीतीही गुंतवणूकदारांमध्ये होती. व्यवहार सुरू होताना निफ्टी काही काळ २४ हजारांच्या वर होता; मात्र तिथून त्याची घसरगुंडी सुरू झाली व तो २३,८९३ अंशांपर्यंत घसरला. परंतु तळाच्या भावाला खरेदी सुरू झाल्यामुळे तेथून तो सावरत दिवसअखेर तो २४,०५५.६० अंशांवर स्थिरावला. दुसरीकडे शुक्रवारी ८१ हजारांच्या आसपास बंद झालेला सेन्सेक्स आज ७८,५८८ अंशावर उघडला. तेथून तो काही काळ बाराशे अंशांनी घसरत तो ७८,२९५ पर्यंत गेला आणि दिवसअखेर तो ७८,७५९.४० अंशांवर स्थिरावला.

बीएसईतील ३,०८४ शेअरमध्ये घसरण

जपानी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक दोन लाख कोटींपेक्षा जास्त आहे. भारतीय शेअर बाजारांमधील एकूण परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीच्या ती साधारण तीन टक्के एवढी आहे. या गुंतवणुकीची दिशाही आता काय राहील याबाबत अंदाज बांधले जात आहे. परिणामी बीएसईवरील ३,०८४ शेअरमध्ये सोमवारी घसरण झाली, तर केवळ ४६९ शेअरचे भाव वाढले आणि ८८ शेअरचे भाव जैसे-थे राहिले.

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

बीएसईमध्ये सूचिबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे बाजारमूल्य शुक्रवारी (ता. २) ४५७.१६ लाख कोटी इतके होते; मात्र सोमवारी झालेल्या पडझडीमुळे ते घटून ४४१.६६ लाख कोटींपर्यंत कमी झाले. त्यामुळे या कंपन्यांचे बाजारमूल्य १५.५ लाख कोटींनी कमी झाले.

...तर बाजारात पुन्हा तेजी

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचे निष्कर्ष लवकरच जाहीर होतील. त्यामुळे बाजारात चढ-उतार येणारच आहेत. मंदीच्या चिंतेने अमेरिकी फेडरल बँकेला व्याजदर कपात करावीच लागेल. तेव्हाच शेअर बाजारात पुन्हा तेजी येईल. भारताचा जीडीपी तसेच कंपन्यांचे निकाल आणि निफ्टीचे मूल्यांकन चांगले असल्यामुळे अशा पडझडीत चांगले शेअर खरेदी करावे,असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळच्या सत्रात बाजारात पडझड झाली तरीही शेवटी तळाच्या भावाला खरेदी झाल्याचे दिसून आले. भारताची चांगली आर्थिक धोरणे, उत्तम आर्थिक स्थिती आणि राजकीय परिस्थिती चांगली असल्यामुळे शेअरबाजारात वाढीचा कल कायम राहील; मात्र काही काळ पडझड होतच राहील.

- विनोद नायर, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस

सर्व क्षेत्रीय निर्देशांक गडगडले

धातूनिर्मिती निर्देशांक पाच टक्के तर बांधकाम व्यवसाय निर्देशांक साडेचार टक्के घसरला. वाहननिर्मिती आणि ऊर्जानिर्मिती क्षेत्राचे निर्देशांकही चार टक्के घसरले. टाटा स्टील, हिंदाल्को, जेएसडब्लू स्टील या शेअरचे भाव चार ते पाच टक्के घसरले. टाटा मोटर आठ टक्के घसरला, माझगाव डॉक, कोचिन शिपयार्ड या शेअरचे भावही आठ टक्के घसरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.