Global Temperature : जागतिक तापमानाने मोडला ८४ वर्षांचा विक्रम ;यंदाचा २१ जुलै ठरला सर्वाधिक उष्ण,युरोपियन क्लायमेट एजन्सीची माहिती

जागतिक तापवानवाढीचा पारा चढताच असून २१ जुलै गेल्या ८४ वर्षांतील सर्वांत उष्ण दिवस ठरला. या दिवशी जागतिक सरासरी तापमान विक्रमी १७.०९ अंश सेल्सिअसवर पोचले, अशी माहिती युरोपीय युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (सी३एस) च्या वतीने देण्यात आली.
Global Temperature
Global Temperaturesakal
Updated on

नवी दिल्ली : जागतिक तापवानवाढीचा पारा चढताच असून २१ जुलै गेल्या ८४ वर्षांतील सर्वांत उष्ण दिवस ठरला. या दिवशी जागतिक सरासरी तापमान विक्रमी १७.०९ अंश सेल्सिअसवर पोचले, अशी माहिती युरोपीय युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिस (सी३एस) च्या वतीने देण्यात आली. गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासूनच्या प्रत्येक महिन्याची सर्वांत उष्ण महिना म्हणून नोंद होत आहे. जागतिक तापमानवाढ निर्धारित दीड अंश सेल्सिअसची मर्यादा ओलांडत आहे. यंदाच्या जून महिनाही याला अपवाद ठरला नाही.

सलग १२ व्या महिन्यात जागतिक तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. सी३एसच्या माहितीनुसार, जुलैमध्येही हाच कल कायम असून यंदाचा २१ जुलै १९४० पासूनच्या ८४ वर्षांतील सर्वांत उष्ण दिवस होता. या दिवशी सरासरी जागतिक तापमान १७.०९ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे, यापूर्वीचा ६ जुलै २०२३ रोजीचा १७.०८ अंश सेल्सिअसचा विक्रमही मोडला गेला. जुलै २०२३ पूर्वी सर्वाधिक दैनंदिन जागतिक सरासरी तापमानाचा विक्रम ऑगस्ट २०१६ मध्ये १६.८ अंश सेल्सिअस इतका नोंदविण्यात आला होता. मात्र, ३ जुलै २०२३ पासून तब्बल ५७ वेळा जागतिक तापमान या मागील विक्रमापेक्षा अधिक होते.

मागील काही वर्षांच्या तुलनेत २०२३ व २०२४ या वर्षांत दैनंदिन जागतिक तापमान लक्षणीयरित्या अधिक नोंदविले गेले. जागतिक सरासरी तापमान साधारणपणे जूनच्या उत्तरार्धापासून ऑगस्टच्या पूर्वार्धादरम्यानच्या काळात उच्चांकी पातळीवर पोचते. दक्षिण गोलार्धातील महासागरांच्या थंड होण्याच्या वेगापेक्षा उत्तर गोलार्धात जमीन वेगाने तापते. जागतिक सरासरी तापमान आधीपासूनच विक्रमाच्या जवळपास असल्याने दररोजच्या तापमानाने नवा विक्रम करणे अनपेक्षित नसल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे.

का वाढतेय तापमान?

सी३एसच्या संशोधकांनी जागतिक तापमानात अचानक वाढ होण्यास अंटार्क्टिकावरील मोठ्या भागावर सरासरीपेक्षा खूपच अधिक तापमान नोंदविले जाणे जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अंटार्क्टिकावरील हिवाळ्यात ही बाब सामान्यच असून त्यामुळे, जुलै २०२३ पासूनच्या प्रत्येक महिन्यात जागतिक तापमानवाढीचा विक्रम होत असल्याचा दावा केला आहे. अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असल्याने दक्षिण महासागराच्या काही भागांत सरासरी तापमानात वाढ झाली आहे.

यंदाचे वर्ष सर्वाधिक उष्ण?

२०२४ हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरेल का, हे ला निनाचे विकसित होणे व त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असेल. २०२३ मधील शेवटचे चार महिने अपवादात्मकरीत्या उष्ण होते. त्यामुळे, २०२४ हे वर्ष २०२३ पेक्षा अधिक उष्ण असेल का, हे आत्ताच सांगता येत नसल्याचेही संशोधकांनी सांगितले. मात्र, २०२४ या वर्षात वार्षिक तापमानाचा नवा विक्रम होण्याची ९२ टक्के शक्यता असल्याचा अंदाज ‘बर्कली अर्थ’ने गेल्या आठवड्यात वर्तविला होता.

प्रगेल्या १३ महिन्यांतील जागतिक तापमान आणि मागील विक्रमात फारच थोडा फरक आहे, ही आश्चर्यजनक बाब आहे. आपण आता तापमानाच्या दृष्टिने अज्ञात प्रदेशात आहोत. तापमानवाढीचा कल असाच सुरू राहिल्यास येत्या काही महिन्यांत व वर्षांत आणखी नवीन विक्रम नोंदविले जातील.

- कार्लो बुओनटेम्पो, संचालक, सी३एस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com