Hindu culture : हिंदू संस्कृतीच्या खाणाखुणा जपणारे व्हिएतनाम

व्हिएतनाम हा देश पर्यटकांसाठी नंदनवन पुरातन हिंदु संस्कृतीच्या अनेक खुणा आहे महाराष्ट्रातील कोकणी पद्धतीच्या तांदुळाच्या पदार्थांशी साम्य दिसते
Hindu culture
Hindu culturesakal
Updated on

व्हिएतनाम : पॅसिफिक महासागरात पाय बुडवून बसलेला चिमुकला व्हिएतनाम हा देश पर्यटकांसाठी नंदनवन आहे. येथे पुरातन हिंदु संस्कृतीच्या अनेक खुणा आहेतच, पण त्यांच्या काही खाद्यपदार्थांचे महाराष्ट्रातील कोकणी पद्धतीच्या तांदुळाच्या पदार्थांशी साम्य दिसते.

आपला देश पर्यटकांसाठी पुन्हा खुला करणाऱ्या व्हिएतनाममध्ये पांढऱ्या वाळूचे फू कोक, न्हातरँग आदी अनेक समुद्रकिनारे, शॅक्स, अॅम्यूझमेंट अँड अॅडव्हेंचर पार्क, नदीकिनारी उभारलेले विस्तीर्ण प्रोमनेड, रोषणाई, साऊंड-लाईट शो, झगमगत्या शहरांमधील नदीतील बोटींवरील नाईट लाईफ, पुरातन वास्तू, जुन्या राजांच्या समधी आणि किल्ले, नदीतील हॉटेलांमधून सूर्यास्त किंवा बोटींमधून सूर्योदय पाहणे, खाडीतील करवंटीच्या आकाराच्या कोकोनट बोटींमधून गोलगोल फिरणे अशी अनेक आकर्षणे आहेत.

त्यातील बा ना हिल्स वर जाणारी पाच किलोमीटर लांबीची रोपवे, वर असलेला हाताच्या पंजाच्या आकाराच्या खांबाने तोलून धरलेला गोल्डन ब्रीज, तेथून उनपावसाच्या खेळात दिसणारे विलोभनीय दृष्य, फोंगहा च्या चाळीस किमी लांब नैसर्गिक गुहा व हाई वान हा दक्षिणपूर्व आशियातील सर्वात मोठा बोगदाही प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे होयांग शेजारच्या मायसन परिसरात सयाम राजांनी चौथ्या शतकात बांधलेले पुरातन शिवमंदिरांचे संकुलही प्रसिद्ध आहे. त्याकाळी येथे मोठी हिंदू लोकवस्ती होती असे सांगितले जाते. या भग्न मंदिरातील शेकडो मूर्ती आता दा नांग शहरातील वस्तुसंग्रहालयात ठेवल्या असून ते देखील पाहण्यासारखे आहे.

सुमारे चार ते पाच चौरस किमी क्षेत्रफळाच्या या संकुलात पूर्वी चाळीस ते पन्नास मंदिरे होती. आता त्यांची पडझड झाली असली तरीही ती पाहून त्यांच्या गतवैभवाची कल्पना सहज येते. हे संकुल शंकर मंदिरांचे असल्याने मोठमोठ्या शिवपिंडी, गणपती व त्याचे गण, नंदी, द्वारपाल, कार्तिकस्वामी यांच्या मूर्ती जास्त आहेत. पण त्याचबरोबर दुर्गादेवी, शेषशायी विष्णू, पद्मनाभ, सरस्वती, वराह, गरुड, लक्ष्मी या देवतांच्या दगडी कलाकुसरीच्या मूर्तीही नजर हटू नये अशा आहेत. तेथील गरुड, वराह इतकेच नव्हे तर देवीच्या डोक्यावरील वेण्या व आंबाडा यांचे कोरीवकाम पाहून तर आश्चर्याने थक्क व्हायला होते. तेथील शीलालेखही आपल्याला त्या कालखंडात घेऊन जातात, इतकेच नव्हे तर या संकुलातील बुद्धमूर्तीही वस्तुसंग्रहालयात जतन केल्या आहेत.

ही देवळे बांधताना भारतीय संस्कृती जपण्याचा दुसरा एक प्रयत्न त्यावेळी केला होता. गंगा नदी आणि मेरुपर्वत यांना भारतीय संस्कृतीत मोठेच महत्व आहे. त्यांची आठवण म्हणून त्या परिसरातील शाम (सयाम - Cyam) पर्वताला मेरुपर्वत मानण्याचा आणि तेथूनच वाहणाऱ्या थु बॉन नदीला श्रद्धेने गंगा नदी मानण्याचा प्रघात तेथे कित्येक शतके सुरु होता. सयाम राजवट संपल्यावर नंतरचे चिनी राजांचे आक्रमण व नंतर अमेरिकी हल्ल्यांमध्ये आणि कालौघात ही देवळे मोडकळीस आली. तरी आता भारतीय पुरातत्व खात्याच्या मदतीने त्यांचे पुनरुज्जीवन सुरु आहे.

त्यांच्या देवांसमोर उदबत्या, आकाशकंदील आदी अनेक बाबतीत आपले व त्यांचे साम्य दिसून येतेच. पण पूर्वजांना देव मानण्याची त्यांची पद्धती व पितरांना मान देण्याची आपली संस्कृतीही बरीचशी सारखी आहे. किंबहुना अॅनसेस्टर वर्शिप (पूर्वजपूजा) हा तेथील प्रमुख धर्मच आहे. हे नागरिक आपल्या पूर्वजांनाच देव मानतात, त्यांना पूजतात व हे पूर्वजच आपले रक्षण करतील, असा ठाम विश्वास ते ठेवतात. येथील भाषा व्हिएटनामी असली तरी त्यांची लिपी इंग्रजी वर्णाक्षरांची व त्यावर काही चिन्हे, अशी आहे. व्हिएटनामची मूळ लिपी ही संस्कृतशी साधर्म्य दाखवणारी होती, असे तेथील संशोधक सांगतात. त्यांच्याकडेही मा या शब्दाचा अर्थ आई होतो व बा या शब्दाचा अर्थ भाऊ असा होतो.

समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या व्हिएतनामच्या हिरव्यागार ग्रामीण भागात फिरताना हटकून कोकण किनारपट्टीची आठवण येते. पावसाळी प्रदेश असल्याने त्यांचे मुख्य खाणे भात हेच आहे. पण महाराष्ट्रीय कोकणी पद्धतीने तांदुळापासून केलेल्या तळलेल्या चिकवड्या, वाफवलेल्या फेण्या त्याच कोकणी चवीची आठवण देतात. तांदूळाच्या पिठाची धिरडी-घावने हे देखील सी फूड बरोबर देण्यात आले. त्यावर छोटेमासे किंवा कडधान्यांचे मोड, कांदे आदी पसरून खायला दिले जाते. तांदळाचे धिरडे तव्यावर घालून ते घट्ट होण्याच्या आत त्याच्यावर तिळ, दाणे चिकटवून व किंचितसा साखरेचा पाक घालून केलेली पातळ पाककृतीदेखील आपल्या चिकी ची आठवण करून देते. वाफवलेल्या-उकडलेल्या तांदळाच्या फेण्याही सेम टू सेम आपल्यासारख्याच लागतात. मात्र काही ठिकाणी त्या पोर्क सोबत ठेवलेल्या असल्याने शाकाहारी मंडळी त्या फेण्या खाण्याची हिंमत करीत नाहीत.

येथील समिष खाणेदेखील आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने तयार करतात. भाताबरोबर आमटी, सूप, भाज्या असतात, मात्र त्यातील पाला व भाज्याही वेगळ्याच असतात. कमळाच्या बियांपासून आपल्याकडे मखणा बनवला जातो. व्हिएटनाममध्ये या बिया शिजवून आपल्याकडील शेंगदाण्यांप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घातल्या जातात. मात्र त्यांचे मसाले वेगळेच असल्याने ते पदार्थ चवीलाही अत्यंत सपक असतात. मात्र तेथील प्युअर व्हेज रेस्टोरंटमधील व्हिएटनामी पदार्थ म्हणजे अननस घातलेला भात, मिक्स फ्राईड राईस, केक, टोफूची कटलेट, वांगे फ्राय, लीमा सीड सूप आदी पदार्थ पोटभर खाता येतात. टोफू म्हणजे सोया दुधाचे पनीर तर लीमसीड हा आपल्याकडील वालाप्रमाणेच पण मोठे कडधान्य आहे. नाहीतर फळे, ब्रेड-आमलेट हा भरपेट नाश्ता आहेच.

स्वस्तात ट्रिप

व्हिएतनामची ट्रीप युरोप अमेरिकेप्रमाणे महागडी नसून स्वस्तात होऊ शकते. तेथील प्रमुख हवाईकंपनी व्हिएटजेट ची तिकिटे आधी काढली तर अगदी स्वस्तात व गर्दीच्या काळात जास्तीत जास्त तीस हजार रुपयांपर्यंत मिळतात. व्हिएटजेटतर्फे प्रवाशांना आकर्षक सेवा आणि काही अटींवर तिकिटदरांवर सवलतीही दिल्या जातात. एका भारतीय रुपयाला साधारण तीनशे व्हिएटनामी डाँग मिळत असल्याने व्यवस्थित नियोजन केल्यास ही टूर खिशाला परवडणाऱ्या दरात होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()