चीनच्या विमानाच्या तैवान सीमेवर घिरट्या

चीनचा राग : नॅन्सी पेलोसी यांच्यावर निर्बंध
Hundreds of fighter jets hovered over  Taiwans border today
Hundreds of fighter jets hovered over Taiwans border today
Updated on

बीजिंग - अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याने वाद निर्माण झालेला असताना चीनने आज पेलोसी यांच्यावर निर्बंध घातले. तर दुसरीकडे जपान येथे नॅन्सी पेलोसी यांनी लोकशाहीचे रक्षण करण्यास अमेरिका आणि आपण कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. यादरम्यान, चीनने काल क्षेपणास्त्र डागलेले असताना शंभर लढाऊ विमानांनी आज तैवानच्या सीमेवर घिरट्या घातल्या.

नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा पूर्ण केल्यानंतर काही तासाच्या आतच चीनने आपले २७ लढाऊ विमन तैवानच्या ‘एअर डिफेन्स झोन’मध्ये रवाना केले होते. त्यानंतर क्षेपणास्त्रांचा माराही केला. पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्याने संतापलेल्या चीनने आज त्यांचे नाव काळ्या यादीत टाकले आहे. पेलोसी यांचा तैवानचा दौरा अशांतता निर्माण करणारा असल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. पेलोसी यांची भूमिका चीनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या विरुद्ध असल्याचे चीनने नमूद केले. चीनने पेलोसी आणि त्यांच्या कुटुंबावर निर्बंध आणले आहेत. परंतु निर्बंधांचे स्वरुप चीनने स्पष्ट केलेले नाहीत, अर्थात हे निर्बंध प्रतिकात्मक स्वरुपातील असेल. दरम्यान, चिनी माध्यमांतून अमेरिकेवर हल्ले केले जात आहेत. चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले की, तैवानला पुढे करून अमेरिका चीनवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण अमेरिकेकडे चीनवर दबाव टाकण्याची धमक नाही.

युरोपीय राजदूतांना केले पाचारण

पेलोसींच्या तैवान यात्रेने संतप्त झालेल्या चीनने युरोपिय युनियनमध्ये सामील असलेल्या सात देशांच्या राजदूतांना पाचारण केले. चीनने त्यांच्या संयुक्त निवेदनावर आक्षेप घेतला आहे. या सात देशांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले, की तैवानच्या सीमेवर चीनने केलेला युद्धाभ्यास चुकीचा आहे. आणि तो तत्काळ थांबवला पाहिजे. चीनने मात्र या निवेदनावर टीका केली आहे. युरोपीय देशांचे निवेदन हे आमच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ करणारे आहे, असे चीनने म्हटले आहे.

चीनने उडविले शंभर लढाऊ विमाने

चीन आणि तैवान यांच्यातील ताण वाढताना दिसत आहे. काल तैवानच्या सीमेलगत क्षेपणास्त्रांचा मारा केलेला असताना आज चीनच्या शंभर लढाऊ विमानांनी घिरट्या घातल्या. त्याचवेळी तैवानने देखील मागे हटण्यास नकार दिला. यादरम्यान, आज सकाळी चीनचे २२ विमान तैवानच्या हवाई संरक्षण क्षेत्रात शिरल्याचे सांगण्यात आले होते.

अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांत नेहमीच संवाद होतो. दोन मोठ्या देशांत संवाद होणे गरजेचे आहे. पण आम्ही चीनच्या व्यावसायिक हितामुळे मानवाधिकारावर बोलत नसू तर जगात आपल्याला कोठेही मानवाधिकारावर बोलण्याचा नैतिक अधिकार राहत नाही. चीन तैवानला एकटे पाडू इच्छित आहे. परंतु आम्ही त्यास एकटे पडू देणार नाही. तैवानचा दौरा करण्यापासून चीन रोखू शकत नाही.

- नॅन्सी पेलोसी, अमेरिकी लोकप्रतिनिधीगृह अध्यक्ष.

लोकशाहीचे संरक्षण करू: पेलोसी

चीनकडून तैवानच्या सीमेवर युद्धाभ्यास सुरू असला तरी नॅन्सी पेलोसी या आपल्या मतावर ठाम आहेत. लोकशाही आणि मानवाधिकाराच्या रक्षणासाठी काम करत राहू, असे पेलोसी यांनी म्हटले आहे. तैवानहून दक्षिण कोरियाला पोहोचल्यानंतर पेलोसी यांनी एक ट्विट केले. त्यात म्हटले की, तैवानच्या जनतेसमवेत अमेरिका उभा आहे. आम्ही लोकशाही आणि मानवाधिकारच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहोत. यादरम्यान, नॅन्सी पेलोसी जपानच्या टोकियोमध्ये दाखल झाल्या. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांची पेलोसी यांनी भेट घेतली. त्यावर किशिदा म्हणाले, की तैवानला समोर ठेऊन चीनने केलेला युद्धाभ्यास ही एक चिंताजनक बाब आहे. त्यामुळे प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेला धोकादायक ठरू शकते. दरम्यान, चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले, की तैवानच्या जलडमरुमध्ये येथे निर्माण झालेल्या तणावावर जपानच्या अधिकाऱ्यांनी केलेले भाष्य हे तैवानच्या चुकांना योग्य ठरविण्याचा प्रयत्न करणारे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.