नवी दिल्लीः भारत आणि म्यानमार यांच्यादरम्यानच्या सीमा भागातील मुक्त संचाराला केंद्र सरकारने आज कायमस्वरूपी ब्रेक लावला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच तशी अधिकृत घोषणा केली.
मणिपूरने या ताज्या घोषणेचे स्वागत केले आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा आणि ईशान्येकडील राज्यांची लोकसंख्याशास्त्रीय संरचना कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरून केलेल्या घोषणेत म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनीच देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचा निर्धार केला असून हे त्यादृष्टाने टाकण्यात आलेले निर्णायक पाऊल असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी गृहमंत्री शहा यांनीच मंगळवारी साधारणपणे दीड हजार किलोमीटरची लांबी असणाऱ्या भारत- म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याची घोषणा केली होती.
इंफाळमधील मैतेई समुदायाने ही मागणी लावून धरली होती. या मार्गानेच काही दहशतवादी संघटना या भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करत असल्याचा आरोप या समुदायाकडून करण्यात आला होता. या सीमेवर कसलेच कुंपण नसल्याने तेथून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचेही या समुदायाने म्हटले होते. या मागणीबाबत शहांनी सकारात्मक पावले टाकण्याची घोषणा केली होती.
देशाच्या सीमा सुरक्षित केल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभारी आहोत. अंतर्गत सुरक्षा आणि ईशान्येकडील राज्यांची लोकसंख्याशास्त्रीय समावेशकता जपण्यासाठी हे महत्त्वाचे ठरेल. बेकायदा स्थलांतराला यामुळे पायबंद होईल, अशी प्रतिक्रिया मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.