Israel-Gaza War : तेहरानमधील हल्ल्यात हमासचा म्होरक्या ठार ; इराण, हमासचा इस्राईलवर आरोप,सूड घेण्याचा निर्धार व्यक्त

इस्राईलवर मागील वर्षी झालेल्या हल्ल्यानंतर ‘हिट लिस्ट’वर असलेला हमासचा प्रमुख इस्माईल हनिया हा आज इराणची राजधानी तेहरान येथे झालेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला. हमास आणि इराणने या हल्ल्याबाबत संताप व्यक्त करताना यामागे इस्राईलचाच हात असल्याचा आरोप केला आहे.
Israel-Gaza War
Israel-Gaza Warsakal
Updated on

बैरूत : इस्राईलवर मागील वर्षी झालेल्या हल्ल्यानंतर ‘हिट लिस्ट’वर असलेला हमासचा प्रमुख इस्माईल हनिया हा आज इराणची राजधानी तेहरान येथे झालेल्या हवाई हल्ल्यात मारला गेला. हमास आणि इराणने या हल्ल्याबाबत संताप व्यक्त करताना यामागे इस्राईलचाच हात असल्याचा आरोप केला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी या हल्ल्याचा सूड घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आजच्या हल्ल्यामुळे इस्राईल-हमास यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इस्राईलवर मागील वर्षी सात ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यानंतर इस्राईलने हनिया आणि हमासच्या इतर नेत्यांना ठार मारण्याचा निश्‍चय जाहीरपणे व्यक्त केला होता. आज पहाटे झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी इस्राईलने अद्याप स्वीकारलेली नसली तरी, त्यांनीच हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तेहरानमध्ये इराणचे नवे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्‍कियान यांचा कालच (ता. ३०) शपथविधी झाला. या शपथविधीला इस्माईल हनिया उपस्थित होता. या कार्यक्रमानंतर काही तासांतच हनिया राहात असलेल्या इमारतीवर हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात हनिया (वय ६१) मारला गेला. इराणच्या राजधानीवरच हल्ला झाल्याने अयातुल्ला खामेनी यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ‘‘सूड घेणे हे आमचे कर्तव्यच आहे. आमच्या घरी आलेल्या प्रिय पाहुण्याला ठार मारून त्यांनी स्वत:साठी कठोर शिक्षेची पार्श्वभूमी तयार केली आहे,’’ असे खामेनी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. नवे अध्यक्ष पेझेश्‍कियान यांनीही हल्लेखोरांना त्यांची जागा दाखवून देण्याचा इशारा दिला आहे. हमास आणि हिज्बुल्ला या दोन्ही संघटनांना इराणचे पाठबळ असल्याचे मानले जाते.

तेहरानमधील हल्ल्यानंतर इस्राईल आणि इराण यांच्यात युद्ध होण्याची शक्यता व्यक्त झाल्यानंतर अमेरिकेने दोन्ही देशांना सबुरीचा सल्ला दिला आहे. ‘युद्ध हाच एकमेव तोडगा असू शकत नाही. राजनैतिक चर्चेच्या माध्यमातून उपाय निघू शकतो,’ असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टिन लॉइड यांनी म्हटले आहे.

प्रादेशिक युद्धाचा भडका शक्य

इराण आणि इस्राईल यांच्यात एप्रिलमध्येच युद्धाचा भडका उसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. इस्राईलने सीरियामधील इराणच्या दूतावासावर हल्ला केला होता. मात्र, अमेरिकेसह इतर काही देशांनी दबाव निर्माण केल्याने युद्ध टळले होते. आता मात्र हनियाच्या मृत्युमुळे शांतता चर्चेतून हमास अंग काढून घेण्याचीही शक्यता आहे.

‘युद्ध नव्या पातळीवर’

हनिया याच्या मृत्युमुळे हमासने एक निवेदन प्रसिद्ध करत सूड घेण्याचा निश्‍चय व्यक्त केला आहे. ‘‘हे युद्ध आता नव्या पातळीवर पोहोचले असून त्याचे संपूर्ण भूप्रदेशावर विपरीत परिणाम होतील. हल्ल्याची व्याप्ती वाढविण्याचा इस्राईलचा निर्णय साफ चुकला आहे. हनियाच्या मृत्युमुळे आम्ही हतबल झालेलो नाहीत. उलट, अशा घटनांनंतर आम्ही अधिक पेटून उठतो,’’ असे या निवेदनात म्हटले आहे.

कोण होता इस्माईल हनिया?

इस्राईलने मागील दहा महिन्यांत हमासच्या मारलेल्या म्होरक्यांच्या यादीत आता इस्माईल हनियाचाही समावेश झाला आहे. आतापर्यंत मारल्या गेलेल्यांमध्ये तो सर्वांत मोठा म्होरक्या होता. इस्राईलवर मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार याह्या सिन्वर हा आहे. तो हमासचा सर्वोच्च म्होरक्या आहे. मात्र, हनिया हा हमासचा मवाळ चेहरा मानला जात होता. इस्राईलकडून हल्ल्याच्या भीतीने २०१९ मध्येच गाझा पट्टीतून बाहेर पडत कतारमध्ये विजनवासात तो राहात होता. एप्रिलमध्ये इस्राईलने गाझामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हनियाची तीन मुले आणि चार नातवंडे मारली गेली होती.

इराणच्या नव्या अध्यक्षांच्या शपथविधीसाठी हनिया तेहरानमध्ये आला असतानाच त्याच्यावर हल्ला झाला. इराणचे दिवंगत अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अंत्ययात्रेसाठी मे महिन्यातही हनिया इराणमध्ये आला होता. त्यावेळी भाषण करताना त्याने, ‘आमची जमीन मुक्त केल्याशिवाय लढा देतच राहू,’ असा इशारा दिला होता. इस्राईलवर मागील ऑक्टोबरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हमासने आपल्या म्होरक्यांचे प्रार्थना करतानाचे व्हिडिओ प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये हनियाचाही व्हिडिओ होता. हल्ल्यात यश मिळाल्याबद्दल तो देवाचे आभार मानत असल्याचे त्यात दिसत होते. हनिया हा हमाचा राजकीय प्रमुख होता. हमासचे इतर देशांबरोबरचे धोरण तो ठरवत असे. गाझा पट्टीतील शस्त्रसंधीसाठी सुरू असलेल्या चर्चांमध्येही तो सहभागी होत असे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.