इस्राइलने ख्रिसमसच्या पूर्वसंध्येपासून सोमवार सकाळपर्यंत गाझावर बॉम्ब आणि दारूगोळ्यांचा भडीमार केला आहे. या हवाई हल्ल्यात सुमारे 70 लोक ठार झाले असून त्यात अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. त्याचवेळी पोप फ्रान्सिस यांनी या युद्धाबद्दल खेद व्यक्त केला आहे. गाझामध्ये आतापर्यंत 20 हजारांहून अधिक नागरिक मारले गेले आहेत.
इस्राइल आणि हमास यांच्यात 80 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हवाई आणि जमिनीवर हल्ले केले जात आहेत. दरम्यान, ख्रिसमसच्या दिवशी इस्राइलने गाझामध्ये मोठा हवाई हल्ला केला आहे. यामध्ये लहान मुले महिला यांच्यासह सुमारे 70 जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीतील हा हवाई हल्ला सर्वात प्राणघातक मानला जात आहे. रविवारी मध्यरात्री काही तास आधी इस्रायली हवाई हल्ला करण्यात आला आणि सोमवारी सकाळपर्यंत (ख्रिसमस) हल्ल्यांची मालिका सुरू राहिली. स्थानिक रहिवासी आणि पॅलेस्टिनी माध्यमांनी सांगितले की, इस्राइलने मध्य गाझामध्ये हवाई आणि जमिनीवर गोळीबार केला आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, हमास संचालित गाझामधील आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, इस्राइलच्या हवाई हल्ल्यात सुमारे 70 लोक मारले गेले. निर्वासितांच्या छावणीला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. अनेक घरांना याचा फटका बसला आहे. गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मृतांची संख्या 20 हजारांने ओलांडली आहे, त्यापैकी दोन तृतीयांश महिला आणि मुले आहेत.
आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-किद्रा यांनी सांगितले की, इस्राइलने मध्य गाझामधील माघाजीला लक्ष्य करून हवाई हल्ले केले. त्याचवेळी इस्त्रायली लष्कराने मघाजी घटनेच्या अहवालाचा आढावा घेत असल्याचे सांगितले.
मुख्य रस्त्यांवर बॉम्बस्फोट
पॅलेस्टिनी रेड क्रिसेंटने जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचे फुटेज प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, इस्रायली युद्ध विमाने मध्य गाझामधील मुख्य रस्त्यांवर बॉम्बफेक करत आहेत, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वाहने अडवत आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, इस्राइलने दक्षिण गाझामधील खान युनिस येथेही हवाई हल्ला केला आहे, ज्यामध्ये आठ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत.
100 हून अधिक इस्रायली नागरिक अजूनही हमासच्या ताब्यात
हमासने अजूनही 100 हून अधिक इस्रायली लोकांना ओलीस ठेवले आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्राइलवर पहिला हल्ला केला. तेथे 1200 हून अधिक लोकांची हत्या करण्यात आली आणि 240 लोकांना ओलिस बनवून गाझामध्ये आणण्यात आले. नंतर 140 इस्रायली नागरिकांना युद्धबंदीच्या अटीवर सोडण्यात आले.तेव्हापासून इस्राइलने गाझा पट्टीला वेढा घातला असून त्यातील बहुतांश भाग उद्ध्वस्त केला आहे.
हमास शासित गाझामधील अधिकाऱ्यांनी आतापर्यंत 20,400 हून अधिक लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. ढिगाऱ्याखाली दबून हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2.3 दशलक्ष बहुतेकांना त्यांच्या घरातून हाकलून देण्यात आले आहे. परिस्थिती भयावह असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.