Israel Vs Hamas: इस्रायली पायदळाने मंगळवारी उत्तर गाझामध्ये हमासचे दहशतवादी आणि पायाभूत सुविधांवर हल्ले केले.या प्रदेशात लढाऊ विमाने बाँबहल्ले सुरू असून काल रात्री ३०० ठिकाणांवर मारा करण्यात आला. यामध्ये रणगाडेभेदी क्षेपणास्र, रॉकेट हल्ल्यांची ठिकाणे, सैन्य दलांच्या छावण्या आणि जमिनीखालील भुयारांचा समावेश आहे.
दरम्यान, हमासने ओलिस ठेवलेल्यांची पहिल्यांदा यशस्वी सुटका केल्याने इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच शस्त्रसंधीचे आवाहन धुडकावून इस्राईलवर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्या हमासला ठेचून काढण्याची शपथ त्यांनी पुन्हा घेतली. इस्राईल-हमास युद्धाचा आज २५ वा दिवस असून गेल्या तीन आठवड्यांत या भागातून आठ लाख नागरिकांनी पलायन केले आहे.
इस्रायली सैन्यदलाने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी भुयारात लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांवर हल्ले केले. यात हमासचे अनेक सदस्य ठार झाले असून हमासचा वरिष्ठ नेता अबू अजीनाही मारला गेल्याचा दावा केला आहे. हमासने ७ ऑक्टोबरला इस्राईलमधील एरेज आणि नेतिव हासारा या शहरांवर केलेल्या हल्ल्यांचा अजीना सूत्रधार होता.
इस्रायली सैन्याने गाझामध्ये अनेक तास एक विशेष आणि गोपनीय सैनिकी मोहीम आखली. यात हमासच्या ताब्यातील ओरी मेगीदिश (वय १९) या इस्रायली महिला सैनिकाची सुटका केली. आता ती तिच्या कुटुंबासोबत असून सुखरूप आहे.
आगामी काळात जमिनीवरील हल्ले आणखी तीव्र करणार असल्याचे इस्रायली सैन्याने स्पष्ट केले. हमासने चार ओलिसांची सुटका केली आहे. इस्राईलच्या कैदेतील पॅलेस्टिनींच्या बदल्यात ते इतर ओलिसांची सुटका करतील असे सांगण्यात येत होते, पण हमासने हा प्रस्ताव नाकारला.हमासने सोमवारी एक छोटा व्हिडिओ जारी केला आहे त्यात तीन इतर महिला बंदिवान दिसत आहेत.
‘शस्त्रसंधी म्हणजे हमासला शरण जाणे’
बेंजामिन नेतानाहू यांनी काल रात्री पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की सात ऑक्टोबरपासून इस्राईलमध्ये ७ ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाला इस्राईलने सुरुवात केलेली नाही. हे युद्ध इस्राईलला नको होते. आम्ही शस्रसंधीची घोषणा करणार नाही. हे हमासला शरण जाण्यासारखे आहे. हमाससारख्या रानटी लोकांशी लढण्यास आपण जोपर्यंत सज्ज होत नाही, तोपर्यंत आपण सर्वोत्तम भविष्याचे वचन पूर्ण करू शकणार नाही.
ओलिस महिलेची नेतान्याहूंवर टीका
हमासने ओलिसांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात तीन इस्रायली महिला दिसत आहेत. ‘नागरिकांचे संरक्षण करण्यात पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अपयशी ठरले आहेत,’ अशी खंत एक महिला व्यक्त करताना या ७६ सेकंदांच्या व्हिडिओत दिसत आहे. सुटकेसाठी कैद्यांच्या देवाणघेवाणीचा प्रस्ताव मान्य करावा, अशी मागणी तिने केली आहे. मात्र हमासने प्रसारित केलेला हा व्हिडिओ म्हणजे प्रचारतंत्र असल्याचा दावा इस्राईलने केला आहे. प्रत्येक ओलिसाची सुटका करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे इस्राईल सरकारचे म्हणणे आहे. हमासने २०० ते २५०० लोकांना ओलिस ठेवले असून केवळ चार जणांचीच सुटका केली आहे.
‘नेतान्याहू यांना हटवावे’
इस्राईलसमोर सध्या कठीण काळ असून देशाचे नेतृत्व करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना पदावरून तातडीने हटविण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य लेबर पक्षाचे नेते मेरव मिचेली यांनी केले असल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इस्राईल’ने दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.