Afghanistan News - इस्लामला मान्य नसलेल्या सेवा पुरविल्या जात असल्यानेच महिलांच्या ब्यूटी पार्लरला अफगाणिस्तानात बंदी घातल्याचे स्पष्टीकरण येथील सत्ताधारी तालिबानने दिले आहे. या ब्युटीपार्लरमुळेच विवाह सोहळ्यात नवरदेवाच्या कुटुंबावर आर्थिक भार पडत असल्याचेही कारणही तालिबानने दिले आहे.
देशातील सर्व ब्यूटी पार्लर एका महिन्यात बंद करण्याचे आदेश तालिबानने दिले आहेत. यामुळे महिला उद्योजकांवर विपरित परिणाम होणार असल्याची चिंता आंतरराष्ट्रीय स्तरांमधून व्यक्त झाल्यानंतर तालिबानचा प्रवक्ता सादिक अकिफ माहजेर याने एक व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिले आहे.
‘ब्युटी पार्लरमध्ये महिलांना दिल्या जाणाऱ्या भुवयांना वळणदार करणे, नैसर्गिक केसांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी इतरांच्या केसांचा वापर करणे आणि मेक-अप करणे यांसारख्या अनेक सेवा इस्लामला मान्य नाहीत. नमाजच्या आधी चेहरा पाण्याने स्वच्छ केला जातो, मेक-अप केल्याने या प्रक्रियेत अडथळा येतो,’ असे माहजेरने सांगितले.
विवाह ठरल्यावर नवरी मुलगी आणि तिच्या महिला नातेवाईकांच्या ब्युटीपार्लरचा खर्च नवऱ्याकडील कुटुंबाने करण्याची अफगाणिस्तानमध्ये प्रथा आहे. ब्युटी पार्लरमुळे नवरदेवाच्या कुटुंबाला बराच आर्थिक फटका बसतो, हे देखील ब्युटी पार्लर बंद करण्याचा आदेश देण्यामागील कारण असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
महिलांनी करायचे काय?
तालिबानची सत्ता आल्यापासून अनेक पुरुषांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नव्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता नजीकच्या काळात नाही. त्यामुळे अशा काही कुटुंबांमधील महिलांनीच पुढाकार घेत विविध ठिकाणी छोट्या नोकऱ्या सुरू केल्या, तर काही महिलांनी ब्यूटी पार्लरसारखे व्यवसाय सुरू केले होते.
तालिबानने महिलांना नोकरी करण्यास बंदी घातल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक उत्पन्नच बंद झाले. आता, ब्यूटी पार्लरही बंद करण्याचा निर्णय घेतल्याने महिलांबरोबरच त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे.
अफगाण महिलांवरील निर्बंध
सहावीनंतर शिक्षण घेण्यास मनाई
सरकारी नोकरी करण्यास मनाई
संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयांमध्ये काम करण्यास मनाई
सार्वजनिक ठिकाणी एकटीने जाण्यास मनाई
दूरचित्रवाणीवर काम करण्यास मनाई
एकटीने प्रवास करण्यास मनाई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.