हिजाबच्या वादामुळं कर्नाटकात सुरू झालेलं आंदोलन राज्यभर पसरलंय.
नोबेल शांती पुरस्कार विजेती आणि पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ता मलाला युसुफजई (Malala Yousafzai) हिनंही हिजाबवरून कर्नाटकात (Karnataka Hijab Disputes) सुरू असलेल्या वादात उडी घेतलीय. यासाठी तिनं ट्विटरचा आधार घेतलाय. मलालानं ट्विटमध्ये लिहिलंय, कॉलेज आम्हाला अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणं, हे खूप भयावह आहे. महिलांनी काय घालवं, काय नको याची वृत्ती आजही कायम आहे. याबाबत भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडं (Muslim women) होणारं दुर्लक्ष थांबवलं पाहिजे, असं आवाहनही तिनं केलंय.
हिजाबच्या वादामुळं कर्नाटकात सुरू झालेलं आंदोलन मंगळवारी राज्यभर पसरलं. कॉलेज कॅम्पसमध्ये दगडफेकीच्या घटनांमुळं पोलिसांना बळाचा वापर करावा लागला, त्यामुळं लाठीचार्जची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, सरकार आणि उच्च न्यायालयानं शांतता राखण्याचं आवाहन केलंय. विद्यार्थिनींना हिजाब घालण्याच्या अधिकारासाठी एका याचिकेवर न्यायालय विचार करत आहे. या प्रकरणाचे मोठ्या वादात रुपांतर झाल्यानंतर कर्नाटक सरकारनं राज्यभरातील शैक्षणिक संस्थांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर केलीय.
मंगळवारी उडुपी जिल्ह्यातील मणिपाल येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये (Mahatma Gandhi Memorial College) भगवी शाल आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींच्या दोन गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्यानं तणाव वाढला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत मुलांचा एक गट मंड्यामध्ये हिजाब परिधान केलेल्या मुलीसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे. मात्र, सोशल मीडियावर या मुलीच्या बाजूनं समर्थनाचा वर्षाव झाला. हिजाब घालण्याच्या मागणीसाठी आपला विरोध सुरू ठेवण्याचा आग्रह धरणाऱ्या मुलीनं सांगितलं, की तिला शिक्षकांचा पाठिंबा आहे. ज्या मुलांनी तिला रोखलं, ते बाहेरचे असल्याचा दावा तिनं केलाय.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आदल्या दिवशी सरकारला शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती. AIMIM प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी विद्यार्थिनींना पाठिंबा दिलाय. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलंय, कर्नाटकमधील मुस्लिम विद्यार्थिनींनी हिंदुत्ववादी जमावानं अत्यंत चिथावणी देऊनही मोठं धाडस दाखवलं, त्यांच्या या कृतीला सलाम, असं नमूद केलंय. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी, मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवला जात आहे, असा आरोप केलाय. मध्य प्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार म्हणाले, हिजाब हा पेहरावाचा भाग नाही, त्यामुळं त्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
हिजाबचा वाद चिघळत असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी मंगळवारी विरोधी पक्ष आणि संबंधितांना चिथावणीखोर विधानं करून तणाव वाढवू नका आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहण्याचं आवाहन केलंय. पोशाखाच्या नियमांबाबत राज्य सरकार कायद्याचे पालन करणार असून न्यायालयातही तशीच भूमिका घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहा आणि न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्ही मान्य करु, असं ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.