अलिकडच्या काही आठवड्यांमध्ये पॅलेस्टाईन समर्थक आंदोलक आणि इस्रायली पोलिसांदरम्यान संघर्ष विकोपाला गेलाय. या संघर्षामुळे जेरुसलेममधील तणाव अधिकच वाढला आहे. दोन्हींबाजूंनी आता एकमेकांवर रॉकेट्स डागले जात आहेत. आतापर्यंत यामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका भारतीय महिलेचाही समावेश आहे. हा सगळा वाद सुरु आहे तो जेरुसलेम शहरावरील मालकी हक्कावरुन... जेरुसलेमबाबतचा नेमका वाद काय आहे? पॅलेस्टाईन समर्थकांचं काय म्हणणं आहे? या सगळ्यात हमास संघटनेचा काय रोल आहे आणि त्यांचा इस्रायलसोबत काय वाद आहे, हे जाणून घेऊयात...
इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या समर्थकांमधला वाद तसा जुना आहे. पण सध्या तो पुन्हा उफाळून वर आला आहे. कारण, येत्या सोमवारी इस्रायलच्या सुप्रीम कोर्टात पूर्व जेरुसलेम संदर्भातल्या खटल्यावर सुनावणी होणार आहे. इथून पॅलेस्टिनी लोकांना बाहेर काढलं जाण्याची भीती वाटत आहे. जेरुसलेममध्ये इस्त्रायली पोलीस आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांमध्ये वाद झाल्यानंतर हमास आणि इस्त्रायलमध्ये हे युद्ध पेटले आहे. ही जागा मुस्लिम आणि ज्यू दोघांसाठीही पवित्र आहेत. मुस्लिम याला हराम अल् – शरीफ म्हणजेच 'पवित्र ठिकाण' असं म्हणतात तर ज्यू या ठिकाणाला 'टेंपल माऊंट' म्हणून ओळखतात.
पॅलेस्टाइन आणि इस्राईल या दोघांचाही जेरुसलेम या शहरावर दावा आहे. यावरून अनेक वर्षांपासून याबाबत संघर्ष सुरु आहे. याबाबत पॅलेस्टाईन लोकांचं समर्थन करणाऱ्या हमासने इस्त्रायलवर रॉकेट्स डागले आहेत. हमासने याआधीच इशारा दिला होता की, आंदोलकांच्या विरोधात सुरु असणाऱ्या इस्त्रायली कारवाईबाबत हमासकडून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल.
इस्रायलने जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता पण बहुतांश देशांना हे कृत्य अमान्य होतं. पॅलेस्टिनी लोकांनी जेरुसलेमवर हक्क सांगितल्याने हा वाद चिघळला आहे. पूर्व जेरुसलेमवर हक्क सांगणारे ज्यू लोक येथून पॅलेस्टिनी लोकांना हुसकावून लावत असल्याचा आरोप केला जात आहे. इस्रायलच्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार होती, पण हिंसाचारांच्या घटनांमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे.
पॅलेस्टाईनमधील लोकांना असं वाटतं की एकदा का त्यांचा देश स्वतंत्र झाला की पूर्व जेरूसलेम त्यांच्या देशाची राजधानी बनेल. पूर्व जेरूसलेममधील शेख जर्रा इथून पॅलेस्टिनी लोकांना बाहेर काढण्यात येत असल्याचे पॅलेस्टाईनचं म्हणणे आहे. त्यावरून हा सगळा वाद सुरू आहे.
हमास ही एक पॅलेस्टाईन राजकीय मते असणारी दहशतवादी संघटना आहे. त्यांनी 1987 मध्ये आपल्या स्थापनेपासूनच इस्रायलच्याविरोधात युद्ध पुकारलं आहे. हमास इस्रायलवर सातत्याने रॉकेटद्वारे हल्ले करुन निशाणा साधतो. इस्रायलला एक पॅलेस्टाईन राज्य बनवायची हमासची इच्छा आहे. या दहशतवादी संघटनेच्या ध्येयधोरणामध्येच इस्त्रायला उद्धवस्त करण्याचा उद्देश लिहला गेला आहे.
या दहशतवादी संघटनेने इस्त्रायलच्या विरोधात 1990 आणि 2000 च्या दरम्यान आत्मघातकी हल्ले केले होते. मात्र, अलिकडच्या वर्षांमध्ये हमासने रॉकेट्सच्या माध्यमातून हल्ले चढवणे सुरु केले आहे. या संघटनेद्वारे पॅलेस्टाईनच्या लोकांना सामाजिक सेवा देण्याचा देखील प्रयत्न करण्यात येतो.
हमास इस्रायलला देश म्हणून मान्यता देत नाही. त्यांचं म्हणणं आहे की, इस्रायलने पॅलेस्टाईन लोकांच्या जमीनीवर अवैधरित्या ताबा मिळवला आहे. गाझा पट्टीवर नियंत्रण मिळवल्यानंतर इस्रायलने या भागाला शत्रूंचा प्रदेश म्हणून घोषित केलं आहे. त्यानंतर इस्रायलने आपल्याबाजूने गाझा प्रदेशातील वीजेचा सप्लाय थांबवला आहे आणि त्यावर इतरही प्रतिबंध लादले आहेत. त्यानंतर हमास आणि इस्रायलच्या दरम्यान वाद वाढतच गेला आणि आता एकमेकांवर रॉकेट्स डागले जात आहेत. 2008 मध्ये दोघांच्या दरम्यान शांतीसाठी समझोता देखील झाला होता. मात्र तो फार काळ टिकू शकला नाही. 2014 नंतर दोन्ही पक्षांमधील वाद वाढू लागले आणि याप्रकारच्या हवाई हल्ल्यांमध्ये आणखीनच वाढ होऊ लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.