Kuwait Fire Incident : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार प्रत्येकी १५ हजार डॉलर नुकसान भरपाई

कुवेतमधील मंगाफ शहरात इमारतीला आग लागून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार डॉलर नुकसान भरपाई म्हणून देणार असल्याचे कुवेत सरकारने आज जाहीर केले.
kuwait fire
kuwait firesakal
Updated on

कुवेतसिटी - कुवेतमधील मंगाफ शहरात इमारतीला आग लागून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार डॉलर नुकसान भरपाई म्हणून देणार असल्याचे कुवेत सरकारने आज जाहीर केले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ५० जणांमध्ये ४६ जण भारतीय होते.

मंगाफ शहरातील एका सात मजली इमारतीला १२ जुलै रोजी पहाटे आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे निष्पन्न झाले होते. एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी ही इमारत भाडेतत्वावर घेतली होती. आगीमुळे प्रचंड धूर होऊन अनेकांचा गुदमरून मृत्यू झाला होता.

मृतांमधील भारतीय केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील नागरिक होते. या सर्वांचे मृतदेह भारतात आणण्यात आले. कुवेत सरकारने या संपूर्ण घटनेची प्राथमिक चौकशी केल्यानंतर आज मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले.

प्रत्येक कुटुंबाला १५ हजार डॉलर मिळणार असून संबंधित देशांच्या दूतावासांमार्फत ही रक्कम कुटुंबीयांना दिली जाणार आहे. आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने प्रत्येकी दोन लाख रुपये, तर केरळ सरकारने पाच लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

कुवेत सरकारमार्फत आगीच्या घटनेची सखोल चौकशी सुरू झाली असून आग लागण्यासारखी परिस्थिती का निर्माण झाली, याचा तपास केला जाणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत एका कुवेती नागरिकाला व काही विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.