क्वालालंपूर : युद्धग्रस्त म्यानमारमधून निर्वासित झालेल्या रोहिंग्यासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक देशांत निर्वासित म्हणून राहणाऱ्या रोहिंग्यांना नवनवीन आव्हानांचा मुकाबला करावा लागत आहे. मलेशियात असंख्य अल्पवयीन रोहिंग्या तरुणी निर्वासित म्हणून राहत असून त्यांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.
चौदा वर्षाची एक अल्पवयीन मुलगी एका ३५ वर्षाचा पतीच्या अत्याचाराला बळी पडत आहे. आपल्या कुटुंबीयांचे पोट भरावे यासाठी तिने आपला जीव धोक्यात घातला. राहण्याची खोली देखील एखाद्या तुरुंगाच्या कोठडीपेक्षा कमी नाही, अशा शब्दांत तिने कैफियत मांडली.
गेल्यावर्षी एका रोहिंग्या मुलीने आपल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी स्वत:चे बलिदान दिले. म्यानमारमधून तिला अनोळखी देशात नेण्यात आले व तिला कधीही न भेटलेल्या आणि पाहिलेल्या व्यक्तीशी विवाह करायचा होता.
या गोष्टी तिच्या मनाविरुद्धच घडत होत्या. तिचे कुटुंबीय उपासमारी आणि गरिबीचा सामना करत असल्याने तिने देश सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच २०१७ पासून रोहिंग्यावर हल्ले करणाऱ्या लष्करशाहीला घाबरलेले होते.
तणावपूर्ण वातावरणात दिवस काढणाऱ्या कुटुंबीयातील ती मुलगी एका शेजारी व्यक्तीच्या मार्फत मलेशियाला गेली. यासाठी तिच्या कुटुंबीयाला ३.१६ लाख भारतीय रुपये (३८०० डॉलर) मिळणार होते.
विवाह झाल्यानंतर तो तिच्या कुटुंबीयांसाठी भोजनाची व्यवस्था करणार होता. त्यामुळे मुलीने कुटुंबीयांसाठी जोखीम उचलली आणि मानवी तस्करी करणाऱ्या व्यक्तीबरोबर निघून गेली. असाच अनुभव कमी जास्त प्रमाणात अन्य मुलींचा देखील आहे.
म्यानमार आणि बांगलादेशातील निर्वासितांच्या शिबिरातील स्थिती बिकट होत असून त्यामुळे कमी वयोगटातील रोहिंग्या मुलीं रोहिंग्या पुरुषांसमवेत विवाह करण्यासाठी मलेशियाला जात आहेत. परंतु तेथे त्यांना अमानवी वागणूक दिली जात आहे.
‘असोसिएटेड प्रेस’च्या वार्ताहराने २०२२ पासून मलेशियात दाखल झालेल्या १२ विवाहित तरुणींशी संवाद साधला असता सर्वात कमी वयाची मुलगी ही १३ वर्षाची असल्याचे सांगण्यात आले. या मुलींनी आपबिती सांगितली.
त्यांच्यासमवेत नेहमीच गैरवर्तन केले जात असे आणि त्यांना खोलीबाहेर जाऊ देत नसत. मलेशियाला जात असताना काहींना मारहाण देखील झाली तर काहींवर बलात्कारही झाले. यापैकी पाच मुलींनी आपल्यावर अत्याचार केल्याचे सांगितले. काही जणी गर्भवती आहेत तर काहींना अपत्य आहेत. आई होण्यास तयार नसतानाही जबरदस्तीने मातृत्व लादल्याचे त्या म्हणाल्या.
१६ वर्षाची ही तरुणी भयानक अनुभवाला सामोरे गेली आहे. ती म्हणाली, ‘‘माझ्याकडे हाच मार्ग होता. २०१७ मध्ये म्यानमारच्या सैनिकांनी घर जाळून टाकले आणि काकूला देखील ठार केले. मी विवाहासाठी तयार नव्हते. परंतु त्याशिवाय माझ्याकडे पर्याय देखील नव्हता.’’
म्यानमारधील सुरक्षा दलाने अनेक युवतींवर बलात्कार केले. या संकटाकडे जगाचे दुर्लक्ष होत असून हजारो जणांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. सैनिकांनी २०२१ मध्ये म्यानमारमधील सरकार पाडले. त्यामुळे निर्वासितांना मायदेशी जाण्याची आशा मावळली आहे.
मलेशियात निमूटपणे अत्याचार सहन करणाऱ्या मुली पोलिसांकडे तक्रार देखील करू शकत नाहीत. कारण बहुतांश मुलींकडे अधिकृत कागदपत्रे नाहीत आणि ते घुसखोर म्हणून ओळखले जातात.
अत्याचाराची, बलात्काराची वाच्यता केल्यास त्यांना मलेशियात तुरुंगात खितपत पडण्याची भीती आहे. एम नावाची चौदा वर्षाची मुलगी मलेशियात एका ५० वर्षाचा माणसासमवेत आली. तो तिला दुसऱ्या एका घरात घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिला खोलीत कोंडून ठेवले. रात्री परतल्यानंतर पुन्हा बलात्कार केला.
त्यानंतर त्या मुलीला दुसऱ्या व्यक्तीकडे सोपविण्यात आले आणि तो तिच्या नियोजित वराकडे घेऊन गेला. ती भितीपोटी नियोजित पतीस बलात्कार झाल्याचे सांगू शकली नाही. कारण बलात्कार झाल्याचे सांगितल्यास तो विवाह करणार नाही, अशी तिला धास्ती होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.