इंफाळ - मणिपूरमध्ये जुलै महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. या दोघांच्या मृतदेहांची छायाचित्रे काल सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केल्याचे जाहीर केले. दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाहीत. जुलै महिन्यांत हे दोन्ही विद्यार्थी इंफाळच्या एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेवटचे दिसले होते. त्यानंतर ते गायब झाले.
हिजाम लिनथोइंगंबी (वय १७) आणि फिजाम हेमीजित (वय २०) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. ते बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांचे फोन बंद झाल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन चुराचांदपूर जिल्ह्यातील विंटर टूरिस्ट स्पॉटजवळील लामदान येथील होते. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले.
या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. नागरिकांनी संयम बाळगावा आणि तपास संस्थांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावरच्या पहिल्या छायाचित्रात एक विद्यार्थी पांढऱ्या टी शर्टमध्ये दिसतो तर दुसरा हमजित हा चेक्स शर्ट व बॅकपॅक धरलेल्या स्थितीत दिसतो. त्यांच्या मागे दोन बंदूकधारी व्यक्ती स्पष्टपणे दिसतात.
दुसऱ्या छायाचित्रात या दोघांचे मृतदेह पडलेले दिसतात पण हे छायाचित्र मणिपूरच्या कोणत्या भागातील आहे, हे स्पष्ट झालेले नाही. तपास यंत्रणा त्या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. सुरक्षा दलाने गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमधील इंटरनेट सेवा पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार पुढील पाच दिवस राज्यात इंटरनेट बंद ठेवण्यात येणार आहे.
मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत १७५ जण मृत्युमुखी पडले आहेत. ११० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. एवढेच नाही तर ५११७ आगीच्या घटना घडल्या आहेत.
प्रियांका गांधी यांची सरकारवर टीका
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. ‘एक्स’ वर पोस्ट करताना मणिपूरमधील हिंसाचारात मुले ही सॉफ्ट टार्गेट राहिले असल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या. ‘‘त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करायला हवेत. मणिपूरमधील गुन्हा हा अक्षम्य आहे. समाजकंटक निदर्यतेने हिंसाचार घडवून आणत आहेत. निष्क्रियतेपणाबद्दल केंद्र सरकारला लाज वाटायला हवी, ’’अशा कठोर शब्दांत त्यांनी टीका केली.
विद्यार्थ्यांचे आंदोलन; ५० जण जखमी
दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ आज इंफाळ खोऱ्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यात पन्नासहून अधिक विद्यार्थी जखमी झाले असून त्यात बहुतांशी युवतींचा समावेश आहे. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच काही वेळ लाठीमारही केला.
काल सायंकाळी दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर मणिपूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आज सकाळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात धुमश्चक्री उडाली. आंदोलक मुख्यमंत्री कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना रोखून धरले. जखमी आंदोलकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.