लंडन : अमेरिका-इंग्लंडसारख्या (america england) देशांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक लसीकरण (vaccine) झाल्यानंतरही कोरोनाच्या (corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतातही डेल्टा व्हेरिएन्टच्या (delta varient) अनेक नव्या रुग्णांची भर पडत आहे. डेल्टा (delta) आणि डेल्टा प्लसचे (delta plus) विषाणू नाक आणि घशामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग करत आहे. त्यावर उपाय म्हणून इंट्रा-नेझल स्प्रेद्वारे लस दिल्यास ती नाक व घशातील विषाणूविरोधात प्रभावीपणे काम करत असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनातून समोर आले आहे.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी सध्या सर्वात प्रभावी उपाय म्हणून संपूर्ण जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे; मात्र लसीकरणानंतरही अनेक देशांमध्ये डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्टमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. हे दोन्ही व्हेरिएन्ट नाक आणि घशामध्ये संसर्ग करतात. सध्या हातावरील स्नायूत दिल्या जाणाऱ्या लशीचा प्रभाव नाक आणि घशातील विषाणूवर कमी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लसीकरण झालेली व्यक्तीही निरोगी व्यक्तीला संसर्ग करत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस इन्ट्रा-नेझल स्वरूपात दिल्यास नाक व घशातील विषाणूवर प्रभावीपणे मात करत असल्याचा दावा ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.
ऑक्सफोर्ड-एस्ट्राझेनेका म्हणजेच भारतातील कोविशिल्ड या लशीचा नाकावाटे दिला जाणारा स्प्रे तयार करून त्याच्या प्राण्यांवर चाचण्या घेण्यात आल्या. नाकावाटे दिलेली लस स्नायूत इंजेक्शनवाटे दिलेल्या लशीपेक्षा अधिक सक्षमपणे कोविड विषाणूवर मात करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच नाकावाटे दिलेल्या लशीमुळे कोणतेही दुष्परिणाम (ताप, सर्दी किंवा अंगदुखी) जाणवले नाहीत. इन्ट्रा-नेझल स्प्रेद्वारे दिलेली लस नाक-घशामध्ये वेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतात.
हातावर दिलेल्या लशीमुळे रक्तामध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीजऐवजी श्वसनमार्गातील अँटीबॉडीज प्रभावीपणे मेमरी बी आणि टी पेशींची निर्मिती करत आहेत आणि त्यामुळेच नाक, घसा, संपूर्ण श्वसनमार्ग तसेच फुप्फुसातील कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात कमी करत असल्याचे दिसून आले. इंजेक्शनवाटे दिलेल्या लशीनंतर तयार झालेल्या अँटीबॉडीज नाकावाटे दिलेल्या लशीमुळेसुद्धा तयार झाल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे इन्ट्रा-नेझलसाठी स्वतंत्र लस तयार करण्याची आवश्यकता नसून सध्या वापरात असलेल्या लशीचाच त्यासाठी वापर करता येईल, असे ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले.
संशोधनातील निष्कर्ष
माकडांवरील चाचणीत नाकावाटे दिलेल्या लशीमुळे फुप्फुसातील विषाणूविरोधातील प्रतिकारशक्ती ७० टक्क्यांनी वाढली.
कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या न्यूमोनियाचे कोणतेही लक्षण दिसले नाही.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील ५४ स्वयंसेवकांवर पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल
एकाही स्वयंसेवकाला दुष्परिणाम (ताप, सर्दी किंवा अंगदुखी) जाणवली नाही.
इन्ट्रा-नेझल लशीसाठी लसीकरण केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही, घरीच लस घेता येणार.
ऑक्सफर्ड विद्यापीठासह अनेक कंपन्या इन्ट्रा-नेझल स्प्रे स्वरूपातील लस विकसित करण्याचे काम करत आहे. साधारण पुढील तीन ते सहा महिन्यात या प्रकारची लस उपलब्ध होईल. ही लस दोन्ही डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस म्हणून देता येईल. त्यामुळे लसीकरण झालेल्या लोकांकडून इतरांना होणारा संसर्ग रोखता येईल.
- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.