Nato : रशिया कमकुवत, पण पराभूत नाही

युक्रेनमधील युद्धात रशियाच्या सैन्यदलाची हानी झाली असली तरी त्यांचा अद्याप पराभव झालेला नाही, ‘नाटो’ने केले स्पष्ट.
Kiev
Kievsakal
Updated on

ब्रुसेल्स - युक्रेनमधील युद्धात रशियाच्या सैन्यदलाची हानी झाली असली तरी त्यांचा अद्याप पराभव झालेला नाही, असे आज स्पष्ट करत ‘नाटो’ या पाश्‍चिमात्य देशांच्या लष्करी संघटनेने आपल्या मोहिमांच्या नियोजनात अनेक महत्त्वाचे बदल करण्याचा आराखडा मांडला.

शीतयुद्धानंतर प्रथमच ‘नाटो’ने मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. रशियाने युक्रेनमधील युद्धाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याची सज्जता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘नाटो’ची पुढील आठवड्यात लिथुनिया देशाची राजधानी विल्नियस येथे नियोजन बैठक होणार आहे. या बैठकीत अमेरिका आणि युरोपमधील सदस्य देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘नाटो’च्या लष्करी समितीचे प्रमुख ॲडमिरल रॉब बाऊर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

युद्धात पुन्हा एकदा जोर लावून हल्ला करण्याची रशियाची क्षमता असल्याचे स्पष्ट करत ॲडमिरल बाऊर म्हणाले,‘‘रशिया आता शक्तिमान देश राहिला नसला तरी तो कमकुवतही नाही. त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे नाटोने सज्जतेसाठी नव्याने नियोजन केले आहे.

युक्रेनवर हल्ला करताना १७ महिन्यांपूर्वी रशियाची जी लष्करी ताकद होती, त्याच आधारावर आम्ही हे नियोजन केले आहे. युद्धामुळे रशियाची लष्करी ताकद कमी झाली असली तरी त्यांचे नौदल आणि हवाई सामर्थ्य अद्याप तितकेच मजबूत आहे.’’ रशियाचे ९४ टक्के पायदळ युक्रेन युद्धात गुंतले असल्याचा दावाही त्यांनी केला.

युक्रेन हा देश अद्याप ‘नाटो’चा सदस्य नसल्याने ही संघटना त्यांना थेट मदत करत नसली तरी ते सदस्य देशांना त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. तसेच, रशियाच्या सीमेला लागून असलेल्या देशांची सुरक्षाही वाढविण्यास ते मदत करत आहेत.

रशियाच्या भाडोत्री सैनिकांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या बंडामुळे इस्टोनिया, लाटव्हिया, लिथुनिया आणि पोलंड यांना त्यांच्या सुरक्षेची चिंता भेटसावत आहे. या भाडोत्री सैनिकांचे, म्हणजे वॅग्नर समूहाचे प्रमुख युव्हजेनी प्रिगोझिन हे सध्या बेलारुसमध्ये आहेत.

पुढील आठवड्यात ‘नाटो’ची बैठक होणारे विल्नियस हे शहर बेलारुसच्या सीमेपासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळेच, आपल्या देशात नाटोची कायमस्वरुपी उपस्थिती असावी, अशी लिथुनियाची इच्छा आहे.

‘नाटो’ची सज्जता

रशियाविरोधात लढण्यासाठी सज्जता म्हणून ‘नाटो’ने इस्टोनिया ते रोमानियापर्यंतच्या देशांच्या पूर्व सीमांवर चाळीस हजार सैन्य तैनात ठेवण्यात आले आहे. या प्रदेशाच्या हवाई हद्दीत दररोज १०० लढाऊ विमाने उड्डाण घेत आहेत.

तसेच, बाल्टिक आणि मध्य समुद्रात २७ युद्ध नौकाही तैनात आहेत. नव्या नियोजनानुसार, पुढील तीस दिवसांत सीमेवरील सैन्यसंख्या तीन लाखांपर्यंत वाढविली जाणार आहे. शिवाय, संभाव्य युद्धक्षेत्राची अटलांटिक, उत्तर आल्प्स आणि दक्षिण युरोप अशी तीन विभागांत विभागणी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.