सोल: दक्षिण कोरियातील काही गटांकडून होणाऱ्या पत्रकबाजीला प्रत्युत्तर म्हणून आज उत्तर कोरियाने या देशात सुमारे सहाशे फुगे पाठविले. मात्र, या फुग्यांबरोबर पत्रक पाठविण्याऐवजी विविध प्रकारचा कचरा पाठविण्यात आला. उत्तर कोरियाने यापूर्वीही एका फुग्यांद्वारे कचरा पाठविला होता.
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यात अनेक दशकांपासून शत्रुत्व आहे. दक्षिण कोरियातील काही गट सीमेवरून उत्तर कोरियाच्या दिशेने फुगे सोडत असतात. या फुग्यांमध्ये पत्रके असतात आणि त्यामाध्यमातून उत्तर कोरियातील जनतेला चिथावणी दिली जाते, असा येथील सरकारचा आरोप आहे.
मात्र, असे प्रकार वारंवार घडत असल्याने उत्तर कोरियाने आज सुमारे ६०० फुगे दक्षिण कोरियाच्या दिशेने पाठविले. या फुग्यांमध्ये सिगारेटची खराब पाकिटे, चिंध्या, खराब कागदं आणि इतर प्रकारचा कचरा भरलेला होता. दक्षिण कोरियाच्या पोलिसांनी सर्व फुग्यांची तपासणी केली. फुग्यांद्वारे कोणताही धोकादायक पदार्थ पाठविला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही फुग्यांमध्ये टायमर आढळले. या टायमरद्वारे फुगे आकाशातच फोडून कचरा खाली पाडण्याचा डाव होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या फुग्यांमुळे सीमाभागातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
‘हा इशाराच समजा’
उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या भगिनी आणि देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्या किम यो जोंग यांनी फुगे पाठविल्याचे मान्य केले आहे. ‘दक्षिण कोरियाने पत्रके पाठविल्यास त्याचे उत्तर अशाच प्रकारे दिले जाईल. हा आमचा इशाराच समजा. ते जितके फुगे पाठवतील, त्याच्या कितीतरी अधिक पट कचरा त्यांना मिळेल,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.