Pakistan Fuel : तस्करीमार्फत आलेल्या स्वस्त इंधनाकडे पाकिस्तानच्या नागरिकांचा ओढा; ५०० पंपांवर कारवाई

पाकिस्तानमधील हंगामी सरकारने बलुचिस्तान प्रांतातील पाचशे पेट्रोल पंपांवर कारवाई करत ते तातडीने केले बंद.
Fuel smuggling
Fuel smugglingsakal
Updated on

कराची - पाकिस्तानमधील हंगामी सरकारने बलुचिस्तान प्रांतातील पाचशे पेट्रोल पंपांवर कारवाई करत ते तातडीने बंद केले. या पेट्रोल पंपांवरून नागरिकांना कमी किमतीचे इराणी पेट्रोल विकले जात होते. त्यामुळे स्थानिक तेलशुद्धीकरण कंपन्यांना आर्थिक फटका बसून आर्थिक हलाखीच्या स्थितीत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचेही नुकसान होत होते. त्यामुळेच या पंपांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाकिस्तानमधील तेल कंपन्याद्वारे पुरवठा होत असलेल्या इंधनापेक्षा इराणमधून आणलेले इंधन कमी किमतीत मिळते. बलुचिस्तानमधील अनेक पंपमालक इराणमधून तस्करीच्या मार्गाने आणलेले पेट्रोल आणि डिझेल ग्राहकांना कमी किमतीत विकत होते. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असल्याने येथे महागाईही प्रचंड वाढली आहे.

त्यामुळे कमी किमतीत मिळत असलेले इंधनच वापरण्यास वाहनचालक प्राधान्य देत होते. मात्र त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांचे मोठे नुकसान होऊन सरकारचाही महसूल बुडत होता. त्यामुळेच सरकारने इराणी इंधन विकणाऱ्या पंपांविरोधात कारवाई केली, अशी माहिती बलुचिस्तानचे हंगामी माहिती मंत्री जान अचाकझाई यांनी दिली.

इंधन आणखी महागले

एकीकडे बेकायदा पद्धतीने आलेल्या का असेना, पण स्वस्तात इंधन देणाऱ्या पंपांवर सरकारने कारवाई केली असताना, सरकारी कंपन्यांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या इंधनाचे दर मात्र वाढविले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दराने नवा उच्चांक नोंदविला असून येथे ३३० रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात आहे. आर्थिक मदत करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने घातलेल्या अटीनुसारच हे दर वाढविण्यात आले आहे. इराणी इंधन त्यामानाने स्वस्त म्हणजे २२० ते २३० रुपये प्रतिलिटर या दराने मिळत होते.

इंधन तस्करी

बलुचिस्तान प्रांतालाच लागून इराणची सीमा आहे. या सीमेवरून इंधनाची तस्करी केली जाते. ही रोखण्यात पाकिस्तानला कायम अपयश आले आहे. ५० ते १०० लिटर क्षमतेच्या कॅनमध्ये इंधन भरून ते इराणमधून बलुचिस्तानमध्ये मालवाहू मोटारींद्वारे आणले जाते. येथून ते इंधन बलुचिस्तानमधील पंपांवर व कराचीसह मोठ्या शहरांत नेले जाते.

बलुचिस्तानमध्ये या इंधनाची खुल्या पद्धतीने विक्री होत होते. इराण हा तेल उत्पादक देश असल्याने तस्करांना तेथून २० ते ३० रुपये प्रतिलिटर इंधन मिळते. इराणमधून इंधन आयात करण्यास पाकिस्तानमध्ये मनाई आहे. तरीही ही तस्करी मात्र बिनबोभाट सुरु असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.